मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वारसदार अमित ठाकरे यांनी आज महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेऊन राजकीय मैदानात उडी घेतली. पर्जन्यवृक्षांचा बळी घेणाऱ्या मिलीबग या किड्याला मारण्यासाठी लेडीबगचा रामबाण उपाय मनसेने आणला आहे़ शिवाजी पार्क येथूनच या प्रयोगाला सुरुवात करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली़गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील पर्जन्यवृक्ष गळून पडण्यास सुरुवात झाली आहे़ यावर केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील काँक्रिटीकरण आणि मिलीबग या किड्यामुळे पर्जन्यवृक्ष मरत असल्याचे उजेडात आले आहे़ मात्र अद्यापही या वृक्षांना वाचविण्यासाठी पालिकेकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आल्याचे दिसून येत नाही़ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त कुंटे यांची आज पालिका मुख्यालयात भेट घेतली़ यामध्ये मिलीबगला वाचविण्याच्या उपाययोजनांचे सादरीकरण ठाकरे यांनी केले़ लेडीबग हा किडा सोडल्यास पर्जन्यवृक्ष वाचतील असा दावा त्यांनी केला आहे़ शिवाजी पार्कमधील पर्जन्यवृक्षांवर हा किडा सोडण्याचा प्रयोग पुढील एक आठवड्यात सुरू करण्यात येईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले़ प्रशासनानेही यास अनुकूलता दर्शविली असल्याचे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राजकारणात?
By admin | Updated: February 10, 2015 02:51 IST