ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ३१ - आगामी विधानसभा निवडणूकीत आपण स्वत: उभा राहणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ही घोषणा करून राज ठाकरे यांनी सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज यांनी ही घोषणा केली. 'या, मला आपल्याशी बोलायचंय' या मथळयाखाली मुंबईभर जाहिरातबाजी करण्यात आली होती. राज काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष होते. राज यांनी अपेक्षेप्रमाणे आश्चर्याचा धक्का देत स्व:त निवडणूक लढविणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुक लढविणारे राज ठाकरे हे ठाकरे घराण्यांतील पहिलीच व्यक्ती ठरणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपल्यावर प्रेम दाखवले तर येणा-या काळात विधानसभा निवडणुकीचे नेतृत्वही आपणच करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा असल्याचेही राज यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
महात्मा गांधी यांचा खरा अनुयायी कोण असेल तर तो म्हणजे राहुल गांधी आहे असे सांगत महात्मा गांधी यांच्या काँग्रेस बरखास्तीची मागणी राहुल गांधी यांनी अंमलात आणली असा उपरोधीक टोला राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना हाणला.
लोकसभा निवडणुकांच्या पराभवानंतर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. पराभवानंतर सभा घेणारा मनसे पहिला पक्ष आहे असे सांगून मनसेला मत देणा-यांचे राज यांनी विशेष आभार मानले. भाजपाला व त्यांच्या मित्रपक्षाला जे काही यश मिळाले ते केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळाले आहे. मोदी यांना स्पष्ट बहुमत मिळाल्याने मोदींचे राज यांनी आभार मानले. विरोधी पक्ष जिंकत नसतो तर सत्ताधारी पक्षाचा पराभव होत असतो असे राज म्हणाले. आजची सभा ही जाहिर चिंतन करण्यासाठी आहे. चिंतन करायचे तर ते सर्वांसोबत करू त्यामुळेच ही सभा घेतली असल्याचे राज यांनी स्पष्ट केले.