मुंबई : उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करून शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे सध्या राजकीयदृष्ट्या अडचणीत असल्याचे चित्र आहे. शिवसेना सोडल्याने स्वतंत्र राजकारण करणाऱ्या या दोन्ही नेत्यांचा उद्धव विरोध मात्र अद्याप कायम आहे. त्यामुळे आगामी काळात राज-राणे हातमिळवणी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. शिवसेना सोडल्यानंतर आक्रमकपणे मराठीचा मुद्दा मांडणाऱ्या राज ठाकरेंची सुरुवात धडाकेबाज झाली. मुंबई महापालिका, विधानसभेत मनसेने घवघवीत यश मिळविले. तर काँग्रेसवासी झालेल्या नारायण राणे यांनी शिवसेनेची कोंडी करण्यात यश मिळविल्याने राज्यात आपला दबदबा निर्माण केला. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांची राजकीय गणिते बिघडली आहेत. मराठीच्या मुद्द्यावर ठोस भूमिका आणि विकासाचे राजकारणात अपयशी ठरल्याने मतदारांनी मनसेला साफ नाकारले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदावर दावेदारी सांगणाऱ्या राणेंच्या मुलाला त्यांच्याच जिल्ह्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर बंडाचा पवित्रा घेणारे राणे काँग्रेसमध्येच एकाकी पडल्याचे चित्र आहे. गेली नऊ वर्षे स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करणाऱ्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी सलोख्याचे संबंध ठेवले. सध्या मात्र एकाचवेळी दोघांची पुरती कोंडी झाली आहे. नाराज राणेंना सामावून घ्यायला कोणताच पक्ष तयार नाही, तर मनसेला महायुतीची दारे बंद आहेत. अशावेळी राज ठाकरे आणि नारायण राणे एकमेकांशी हातमिळविणी करण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत. सहकार्याचे राजकारण करीत मुंबई आणि कोकणात यश मिळविण्यावर भर देण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
राज-राणे हातमिळवणी?
By admin | Updated: July 31, 2014 04:35 IST