पालघर : पालघर तालुक्यात मुसळधार पावसाने जोर धरला असून पालघर शहरातील रस्त्यावर पाणी साचू नये म्हणून कोट्यवधी रूपयांचा खर्च करून शहरात गटारांची बांधणी करण्यात आली आहे. अशावेळी पावसाचे पाणी गटाराव्दारे वाहून जाणे अपेक्षीत असतांना आज गणेशकुड माहिम रोड, लोकमान्य, विष्णूनगर, लोकमार्ग, गोठणपूर नाका, इ. भाग पाण्याखाली गेल्याने नागरीकांचे जीवन विस्कळीत झाले. मुसळधार पडलेल्या पावसाने नगरपरिषदेच्या पावसाळयातील उपाय योजनांचे पितळ उघडे पडले. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याखालून वाहणारा नाला भरून गेल्याने वाहतूक काही काळ बंद पडली. यावेळी अग्निशमनच्या जवानांनी दोर बांधून नागरीकांना इच्छितस्थळी पोहचवले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्गावरील नगरपरिषदेचा नाल भरभरून वाहू लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात व बिडको औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात जाणारे नागरीक व वाहतूक काही काळासाठी बंद पडली. तर त्या पाण्यातून जाणे धोकादायक असल्याने पालघरच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोराच्या सहाय्याने नागरीकांना, विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या इच्छितस्थळी पोहचविले. याच वेळी पालघर बोइसर रस्ता दरम्यान प्रांत कार्यालय व उमरोली येथे पाणी साचल्याने काही काळासाठी वाहतूक बंद पडली होती. कालांतराने पावसाचा जोर ओसरल्यावर स्थिती पूर्व पदावर आली. (वार्ताहर)
पालघरमध्ये पावसाचे थैमान
By admin | Updated: July 31, 2016 03:01 IST