सोलापूर : सप्टेंबर महिन्यातील काही दिवसांचा अपवाद सोडला तर गायब झालेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या थांबल्या असून, भरवशाचा परतीचा पाऊसही पडला नसल्याने रब्बी पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा १,३१७ मि.मी. इतका पाऊस कमी झाला आहे. मागील वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीपेक्षा २५१.३२ मि.मी. इतका अधिक पाऊस पडला होता. मागील वर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान सतत पाऊस पडत राहिल्याने खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या पदरात पडला होता. चांगले पीक आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असतानाच सरत्या रब्बी हंगामात गारपीट झाल्याने काहीअंशी पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी पैसेही मिळाले होते.यंदाचे चित्र उलटे आहे. सोलापूर जिल्हा हा रब्बी हंगामासाठीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात १५ आॅगस्टनंतर सुरू झालेला पाऊस सप्टेंबरअखेरपर्यंत पडत असतो. यंदा ही परंपराखंडित झाली. जून ते सप्टेंबरमध्ये एकूण ५,३७७ मि.मी. इतका तर सरासरी ४८९ मि.मी. पाऊस पडतो. मात्र एकूण ४,०६० मि.मी. इतका तर सरासरी ३६९ मि.मी. इतका पाऊस झाला.
सोलापूरमध्ये पाऊस अन् रब्बी पेरण्या थांबल्या
By admin | Updated: October 16, 2014 05:06 IST