सायली जोशी , पुणेविविध क्षेत्रात होणारा मराठीचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहून मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी राज्य मराठी विकास संस्थेने विशेष पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत येणाऱ्या केंद्र शासनाच्या भारतीय रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या मुंबई रेल्वे विकास कॉपोर्रेशनमधील अधिकाऱ्यांना मराठीचे धडे दिले जाणार आहेत. राज्याच्या सर्व शासकीय विभागांचे कामकाज मराठी भाषेत होत असल्याने देशाच्या विविध भागातून नेमणूक झालेल्या अमराठी अधिकारी वर्गाची भाषेच्या बाबतीत गैरसोय होते. हे लक्षात घेऊन या अमराठी अधिकाऱ्यांची अडचण होऊ नये यादृष्टीने मराठीच्या विशेष वर्गाची आखणी करण्यात आली आहे. रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. तसेच येथे काम करणारे अधिकारी -कर्मचारी हे अन्य भाषिक आहेत. मुंबईत काम करत असल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मराठी भाषेशी रोजचाच संबंध येतो. त्यामुळे त्यांना या भाषेचे किमान ज्ञान असावे यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉपोर्रेशनने अधिकारी-कर्मचारी यांना मराठी संवाद कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानूसार रेल्वेतील १०० अधिकाऱ्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण आठवड्यातून २ वेळा ९० मिनीटांची एक तासिका असे ३ महिन्यांचे असणार आहे. त्यामध्ये ३० जणांचे २ गट आणि ४० जणांचा १ गट करण्यात आला आहे. यातील पहिल्या बॅचचे शिक्षण नुकतेच सुरु झाले असून अधिकारी अतिशय उत्साहाने यामध्ये सहभागी होत असल्याचे हे प्रशिक्षण वर्ग घेणाऱ्या व या प्रशिक्षणाच्या समन्वयक प्रा.सोनाली गुजर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. हा अभ्यासक्रम शासनमान्य विद्यापीठातील प्रशिक्षित शिक्षकांनी तयार केला असून तो दृकश्राव्य स्वरुपात आहे. चित्रे, तक्ते, दैैनंदिन व्यवहारातील शब्दातील संवादाच्या माध्यमातून भाषा शिकवली जाणार आहे.
रेल्वे अधिकारी घेताहेत मराठीचे धडे!
By admin | Updated: September 27, 2015 00:44 IST