प्रवासी त्रस्त : कन्फर्म तिकीट मिळणे झाले कठीण नागपूर : सण-उत्सवादरम्यान रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जात असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेत प्रवाशांची गर्दी वाढली आहे. परिणामी कन्फर्म तिकिट मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवाळी साजरी करून आपापल्या गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच छटपूजेसाठी उत्तर भारत आणि बिहारकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना रेल्वेत बसायलासुद्धा जागा मिळेनासी झाली आहे. ज्यांनी खूप दिवसांपूर्वी आरक्षित तिकीट घेऊन ठेवली आहे त्यापैकी अनेक प्रवासी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. दिवाळी साजरी करून परतणारे, किंवा छटपूजेसाठी आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांना नाईलाजास्तव उभ्याने प्रवास करून आपल्या गावी पोहोचायचे आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर रविवारीसुद्धा प्रचंड गर्दी होती. रविवारची सुटी असूनही आरक्षण कार्यालयातील अधिकारी आजही काम करीत होते. आरक्षण कार्यालयातील दोन काऊंटर प्रत्येक रविवारी उघडे राहतात. परंतु गर्दी पाहता आणखी तीन काऊंटर उघडावे लागले. पाचही काऊंटरवर प्रवाशांच्या लांब रांगा होत्या. दुसरीकडे व्हीआयपी कोटा, तत्काल कोट घेण्यासाठी सुद्धा गर्दी होती. तत्काल तिकिटे संपल्याने अनेक प्रवाशांना ट्रॅव्हल्स बसचा आसरा घ्यावा लागत आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेगाड्या हाऊफुल्ल!
By admin | Updated: October 27, 2014 00:33 IST