अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचा मुख्य लेखापाल व वित्त अधिकारी प्रवीण देवीचंद जैन यास, त्याच्या कार्यालयातच १० हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजता रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.प्रवीण जैन हा वर्ग-१ चा अधिकारी आहे. जिल्हा परिषदेच्या एका स्टेशनरी पुरवठादार कंत्राटदाराचे बिल मंजूर करून त्यास पैसे अदा करण्याकरिता जैन याने १० हजार रुपयांची लाच या कंत्राटदाराकडे मागितली होती. याबाबत कंत्राटदाराने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्याची खातरजमा शुक्रवारी सकाळी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुनील कलगुटकर यांनी केली. लाचेची १० हजार रुपयांची रक्कम घेवून त्या कंत्राटदारास जैन याने रायगड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधील आपल्या कार्यालयात येण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे दुपारी चार वाजता जैन याच्या कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुनील कलगुटकर व पोलीस निरीक्षक यास्मिन इनामदार यांच्या पथकाने सापळा लावला. सव्वाचार वाजता जैन यास कंत्राटदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. मुरुड तालुक्यात बोर्लीमांडला व ठाणे येथे त्याची दोन घरे आहेत. जैन यास अटक केल्यावर त्याच्या मालमत्तेची तपासणी करण्यात येत असून, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
रायगड जि.प.च्या मुख्य लेखापालाला अटक
By admin | Updated: September 12, 2015 02:10 IST