लांजा : जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर रेडीज यांच्यावर आज (बुधवार) सकाळी ९.३० वा. दरम्यान खेरवसे स्टॉपनजीक अज्ञात पाचजणांनी हल्ला केला. रेडीज या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हा हल्ला राणे समर्थकांनी केला असावा, असा संशय मनोहर रेडीज यांनी आपल्या फिर्यादीमध्ये व्यक्त केला आहे. मनोहर रेडीज यांनी लांजा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. आज सकाळी ९.१५ वा. नेहमीप्रमाणे आपण आपल्या मुलासोबत मोटारसायकलवरून लांजाकडे येण्यासाठी वेरवली येथून घरातून निघालो. दोघेजण गप्पा मारत लांजाला येत असतानाच खेरवसे स्टॉपदरम्यान एक तवेरा गाडी मागून येत होती. अचानक ही गाडी मोटारसायकलच्या पुढे येऊन थांबली. त्या गाडीतून २५ ते २८ वर्षे वयोगटांतील पाच तरुण पटकन उतरले. प्रथम त्यातील एका तरुणाने आपल्या मुलाला पकडून ठेवले व उर्वरित चौघांनी हातामध्ये असलेला लोखंडी रॉड आपल्या डाव्या पायावर मारला. आपण प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत दुसरा फटका हातावर झेलल्याने हाताला दुखापत झाली असल्याचे रेडीज यांनी फिर्यादीत नमूद केले. मारहाण करून हे पाच तरुण गाडीत (एमएच ०४ एफआर २९८९) बसून फरार झाले. रेडीज यांनी जखमी अवस्थेतच फोन करून लांजा पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. लांजा पोलिसांनी तत्काळ सर्वत्र नाकाबंदी केली. मारहाणीचे वृत्त समजताच अनेकांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. पोलीस निरीक्षक रामचंद्र गावडे यांनी या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. संजय पाटील यांना दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मनोहर रेडीज यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक बाजीराव पाटील लांजामध्ये दाखल झाले. रेडीज यांना मारहाणीमध्ये झालेल्या जखमा गंभीर स्वरूपाच्या नसल्या तरी या हल्ल्याची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. खा. नीलेश राणे यांच्या माणसांनी आपल्यावर हल्ला केला असावा, असा संशय मनोहर रेडीज यांनी व्यक्त केला असून, लांजा पोलिसांनी पाच अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेकडून जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापतिपद, तसेच लांजा पंचायत समितीचे सभापतिपद भूषविलेल्या मनोहर रेडीज यांनी नारायण राणे यांच्याबरोबरच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (प्रतिनिधी)ं
रेडीज यांना लोखंडी शिगांनी मारहाण
By admin | Updated: May 8, 2014 12:46 IST