ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 4 - पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया आणि श्रीकांत पाठक आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांची शुक्रवारी पुन्हा बदली करण्यात आली आहे़ त्याचवेळी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशावरून तीन पोलीस उपायुक्तांच्या शहरांतर्गत बदल्या करण्यात आल्या.
गेल्या महिन्यांच्या अखेरीस पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांची पुणे शहर पोलीस दलातून महामार्ग सुरक्षा पथकाचे अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली होती़ त्यांची आज परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली़ पोलीस उपायुक्त श्रीकांत पाटील यांची मुंबई पोलीस उपायुक्ताऐवजी आता दौंड येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक ७ चे समादेशक म्हणून बदली झाली आहे़ पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांची लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य या पदाऐवजी आता दौंड येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक ५ चे समादेशक म्हणून बदली झाली आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांची नागपूर येथील गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे.
अशोक मोराळे वाहतूक उपायुक्त-
पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेचे डॉ़ प्रवीण मुंढे यांची परिमंडळ २ चे उपायुक्तपदी बदली झाली आहे़ परिमंडळ २ चे उपायुक्त पंकज डहाणे यांची गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी तर राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक अशोक मोराळे यांची पुणे शहरात बदली झाली आहे़ त्यांच्याकडे वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.