नागपूर : राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत आहे. कर्करोगाचे त्वरित निदान झाल्यास उपचाराचा खर्च कमी होतो व रोगाची गुंतागुंतही कमी होते. त्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कर्करोगाच्या उपचारास सरकारकडून भरीव मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.कॅन्सर रिलिफ सोसायटीतर्फे रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी रीजनल कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कॅन्सर रिलिफ सोसायटीचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त अनुप कुमार, उपाध्यक्ष बसंत लाल साव आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गरिबांबाबत संवेदना जपल्या. त्याच शिकवणीच्या आधारावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रीजनल प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर ही संस्था मागील ४५ वर्षांपासून कर्करुग्णांची अविरत सेवा करीत आहे. नितीन गडकरी म्हणाले, नागपुरात विदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेश व अन्य राज्यातूनही कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी येतात. गरीब रुग्णांना माफक दरात सेवा मिळणे आवश्यक आहे. कर्करोगाचे त्वरित व अचूक निदान, दर्जेदार सेवा मिळण्यासाठी रुग्णालयाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कर्करोगाच्या उपचारांसाठी भरीव मदत देणार - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 05:05 IST