अलिबाग : महाराष्ट्राला भाजपासून धोका आहे, त्यामुळे राज्यातील सत्तेपासून त्यांना रोखण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन जनता दल युनायटेडचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री खा. शरद यादव यांनी शुक्रवारी अलिबागमध्ये केले. ते एका जाहीर सभेत बोलत होते. विधानसभेच्या निवडणुकीसाठी शेकापचे अधिकृत उमेदवार सुभाष उर्फ पंडित पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी शेतकरी भवनाबाहेर झालेल्या सभेत शरद यादव बोलत होते. ‘जनता दल युनायटेड, शेकाप, सीपीएम, रिपब्लिकन सेना, शिवराज पक्ष यांची संयुक्त आघाडी झाली असून राज्यातील २८८ जागा आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘देशात एकच इस्ट इंडिया कंपनी आली होती, आता मात्र अशा अनेक कंपन्या अस्तित्वात येतील,’ अशी तोफ यादव यांनी केंद्रातील मोदी सरकावर डागली. ‘देशात एसईझेड मोठ्या प्रमाणात मंजूर केल्याने शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने भांडवलदार उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव सर्वत्र हाणून पाडण्यात आला होता. परंतु रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा एसईझेड विरोधातील लढा शेकापने उभारला आणि तो हद्दपार केला,’ असे उद्गार यादव यांनी काढले.‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना यांना घरी बसविण्यासाठी २८८ जागा लढवणार असून त्याचसाठी आम्ही एकत्र आलो आहोत,’ असे शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. ‘लोकसभेच्या निवडणुकीत गाफील राहिल्याने पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता मात्र त्या पराभवाचा वचपा काढायची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागा,’ असे आवाहन पाटील यांनी केले. याप्रसंगी रिपब्लिक सेनेचे आनंदराज आंबेडकर, शिवराज पक्षाचे ब्रिगेडीयर सुरेश सावंत, सीपीएमचे सचिव अशोक ढवळे, शेकापच्या आ. मिनाक्षी पाटील, विधानसभेचे उमेदवार पंडीत पाटील, प्रा.एस.पी. जाधव, जनता दल युनायटेडचे तारीक चुनावाला उपस्थित होेते. दरम्यान, पंडीत पाटील यांनी उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी रस्ते शेकापच्या लाल बावट्यांनी फूलले होते. (विशेष प्रतिनिधी)
भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी सिद्ध व्हा
By admin | Updated: September 27, 2014 06:14 IST