मुंबई : दिंडोशी विधानसभेतील मालाड (पूर्व) कुरार बाणडोंगरी येथील गणेश टेकडी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात या भागात दरड कोसळली होती. त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना अद्याप काहीही सुरक्षेची उपाययोजना झालेली नसल्यामुळे येथील ५५० कुटुंबीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. या प्रकरणी गणेश टेकडी झोपु प्रकल्पातील नागरिकांसाठी पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंत बांधणार असल्याचे झोपडपट्टी प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी आसिम गुप्ता यांनी सांगितले. शुक्रवारच्या पाहणीदरम्यान दिंडोशीचे आमदार, विभागप्रमुख आणि माजी महापौर सुनील प्रभू यांना गुप्ता यांनी हे आश्वासन दिले. येत्या पावसाळ्यात गणेश टेकडी येथील नागरिकांसाठी उपाययोजना केली पाहिजे, ही बाब लक्षात येताच आमदार प्रभू यांनी असीम गुप्ता व संबंधित अधिकाऱ्यांसह आज दुपारी जागेची पाहणी केली. या वेळी स्थानिक नगरसेवक सुनील गुजर, महिला शाखा संघटक ऋचिता आरोसकर, भाविसे विभाग ३चे निमंत्रक विजय गावडे उपस्थित होते.
दिंडोशी बाणडोंगरीत पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंत
By admin | Updated: May 21, 2016 02:14 IST