कोल्हापूर : कोल्हापूरहून हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यासंदर्भात उद्योगपती संजय घोडावत यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मंगळवारी प्रस्ताव सादर केला. यावेळी हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली जाईल, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली.अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटला पालकमंत्र्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी हवाई वाहतूक सेवा सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाचे पालकमंत्र्यांकडे सादरीकरण केले. घोडावत ग्रुपची ‘घोडावत एंटरप्रायजेस प्रा. लि.’ ही हवाई वाहतूक कंपनी सध्या दोन हेलिकॉप्टर विनावेळ तत्त्वावर चालविते. त्यामध्ये डबल इंजिन हेलिकॉप्टर, ई.सी. १३५ व ई.सी १३० हे आहेत. यासह कंपनीमार्फत ई.सी.१३५ हे हेलिकॉप्टर व ईआरजीई १३५ हे विमानसुद्धा लवकर सुरू करण्याचा मानस आहे, तसेच सध्या कोल्हापूर विभागात एकही ‘वैमानिक प्रशिक्षण स्कूल’ नाही. त्यासाठी घोडावत ग्रुप प्रशिक्षण स्कूल तसेच फ्लार्इंग क्लब लवकरच सुरू करेल, आदी बाबींचा या प्रस्तावात समावेश आहे.घोडावत म्हणाले, कोल्हापूर हे अनेक शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्राचे केंद्रस्थान आहे. सध्याची कोल्हापूरमधील हवाई सेवा सुरळीत सुरू नाही. हवाई वाहतूक सेवा सुरळीत सुरू नसल्याने एक तर पुणे किंवा बेळगाव या ठिकाणी जावे लागते. यामध्ये पैसा व वेळ दोन्ही गोष्टी खर्ची पडतात. जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी सुरळीत हवाई वाहतूक सेवा अत्यंत गरजेची आहे, जेणेकरून पैसा व वेळ दोन्हीही वाचेल. पालकमंत्री पाटील यांनी हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली जाईल, अशी ग्वाही दिली.घोडावत ग्रुपला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा, एन.बी.ए. अॅक्रिडेशन व आयएसओ मानांकन व विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबद्दल पालकमंत्र्यांनी यावेळी संजय घोडावत यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
विमानसेवेसाठी घोडावत यांचा प्रस्ताव
By admin | Updated: December 31, 2015 00:17 IST