‘आता ह्यो कोण महाराज ठाण मांडून बसलाय पारावर. कमंडलूबी दिसतंया जवळ. आंगारा-बिंगारा तर आणला नसंल त्यानं गावावर फुकायला! काय सांगावं, निवडणुका आल्या की बुवा-बाबांचं पीक जोमात येतं म्हणं! झाडाआड लपून दाजिबा कुजबुजला.‘आपसूक कळायला आपुन काय ज्योतिषी हाय व्हय? चल, त्यालाच इच्यारू.’ नारू म्हणाला.‘जय ‘गडकरी’बाबा, सगळ्यांचं भलं करी बाबा! या पोरांनो. निश्चिंत होऊन बसा.’ महाराज उद्गारले. ‘कुण्या गावचं म्हणायचं तुमी?’ नारूनं विचारलं.‘सन्याशाला गाव नसतं. आमचा वास गडावर, ‘गडकरी’बाबांच्या सहवासात! जय ‘गडकरी’बाबा, सगळ्यांचं भलं करी बाबा!’ महाराज उत्तरले.‘नेमकं कुठल्या गडावरचं तुमी?’ नारूनं विचारलं.‘कोणत्या म्हणून काय पुसता? आम्ही ‘दिल्लीगडा’चे गडकरी! ग्यानी, अतिग्यानी, परमग्यानी, अंतर्ग्यानी अशा ‘गडकरी’बाबांचे चेले. त्यांनी ‘कमळा’वरी बसवुनी ‘दिल्लीगडा’वर नेले आणि लोकसेवेचे उपदेश केले! नुकतीच बाबांनी केलेली भविष्यवाणी महा राष्ट्रात गाजते आहे! तुम्ही नाही ऐकली?’ महाराजांनी विचारलं.‘भविष्यवाणी? नाय ऐकली बुवा!’ दाजिबा म्हणाला.‘बुवा कोणाला म्हंतोस रे मुर्खा? शाप देऊन कावळा करीन तुझा!’ महाराज गरजले.‘त्याच्याकडं नका लक्ष देऊ महाराज. कावळ्याच्या शापानं गाय कुठं मरती व्हय! काय भविष्यवाणी केलीय म्हणाला ‘गडकरी’बाबांनी?’ नारू म्हणाला.‘सांगतो. त्यासाठीच इथे अवतरलोय! मतितार्थ समजून घ्या... ऐका,‘गडकरी’बाबांची बोले वाणी लक्ष्मी आली हो अंगणी, लक्ष्मीदर्शनाचा योग जना, पुढल्या दशदिनी! ताई-माई-अक्का, आली लक्ष्मी लाथाडू नका खाऊन घ्या, पिऊन घ्या शर्ट घ्या-पॅन्ट घ्या, लुगडं पण घ्या, नटायचं तेवढं नटून घ्या, लुटायचं तेवढं लुटून घ्या, भ्रष्टांनी जमविली माया, सगळ्यांनी वाटून घ्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्या पण... ‘गडकरी’बाबांची ‘निशानी’ असू द्या मनी, जनहो, अशी ही भविष्यवाणी लक्ष्मी आली हो अंगणी...! जय ‘गडकरी’बाबा, सगळ्यांचं भलं करी बाबा!’ महाराज उद्गारले.धन्य हो महाराज, तुमचा दृष्टांत चांगलाच लक्षात आलाय आमच्या. ‘साधूसंत येति घरा, तोचि दिवाळी दसरा,’ असं का म्हंत्यात ते आता आलं लक्षात! ‘गडकरी’बाबांना आमचा दंडवत सांगावा.’ दाजिबानं महाराजांना शालजोडी मारली.प्रदीप यादव
‘गडकरी’बाबांची भविष्यवाणी
By admin | Updated: October 7, 2014 23:48 IST