मुंबई: राज्य पोलीस दलातील महासंचालक पदाच्या दोन रिक्त पदापैकी एक पद भरण्याला अखेर गृहविभागाला ‘मुहूर्त’ मिळाला असून, अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) एस. पी. यादव यांची विधी व तंत्र विभागाच्या महासंचालकपदी बढती करण्यात आली आहे. त्या ठिकाणचे प्रमुख प्रभातरंजन यांची ‘होमगार्ड’च्या महासमादेशकपदी बदली करण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्याबाबतचे आदेश गृहविभागाकडून जारी करण्यात आले. राकेश मारिया मंगळवारी निवृत्त झाल्याने ‘होमगार्ड’चे पद रिक्त होते. मात्र, गेल्या १ आॅगस्टपासून रिक्त असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)चे महासंचालक पद अद्यापही रिक्त आहे. एस.पी.यादव हे १९८६ आयपीएस बॅचचे अधिकारी असून, गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस मुख्यालयात कायदा व सुव्यवस्था पदाची जबाबदारी स्वीकारत आहेत. दरम्यान, गृहविभागाने आपली सेवाजेष्ठता डावल्याचा आक्षेप घेत, ‘होमगार्ड’चे उपमहासमादेशक संजय पांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याबाबत येत्या मंगळवारी (दि.७) सुनावणी होणार आहे. याबाबतच्या निर्णयानंतर गृहविभागाला डीजीचे अन्य रिक्त पद भरता येणार आहे. (प्रतिनिधी)
एस.पी.यादव यांना महासंचालकपदी पदोन्नती
By admin | Updated: February 5, 2017 00:35 IST