सुरेंद्र राऊत - यवतमाळ राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यपकांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून दीडशेवर प्राध्यापकांना लवकरच पदोन्नती मिळणार आहे. शिक्षण व आरोग्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी वैद्यकीय शिक्षक संघटनेसोबत घेतलेल्या संयुक्त बैठकीत हा निणर्य घेण्यात आला.राज्य शासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय शिक्षकांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे या महाविद्यालयात कार्यरत अनेक सहायक प्राध्यापकांच्या पदोन्नत्या रखडल्या. ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या प्रधानसचिव मनिषा म्हैसकर यांनी विशेष निर्देश दिले असून या विभागात प्रत्येक सोमवारी आस्थापना विषयक बैठक घेण्यात येत आहे.सातत्याने एकाच जागेवर कार्यरत वैद्यकीय शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने लावून धरली आहे. याची दखल घेत आरोग्य शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालबद्ध पदोन्नतीचा कायदाच करण्यात यावा, असे निर्देश दिले. संघटनेने गेल्या अनेक वर्षांपासून अस्थायी सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत वैद्यकीय शिक्षकांचाही प्रश्न मांडला. या शिक्षकांना कायम करण्यास मात्र सचिवांनी स्पष्ट नकार दिला. या शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. त्यात सचिव, संचालक आणि अधिष्ठाता यांचा समावेश राहणार आहे. अस्थायी शिक्षकांची निवड करून त्यांना बोनस गुण दिले जातील. त्यातही ‘डायना’ (धुळे, यवतमाळ, नांदेड, अंबेजोगाई) या आदिवासी बहुल भागातील वैद्यकीय अस्थायी शिक्षकांना अधिक गुण देणार असल्याचे सांगितले. बैठकीला संघटनेचे नागसेन रामराजे उपस्थित होते.
राज्यातील दीडशे वैद्यकीय शिक्षकांची पदोन्नती
By admin | Updated: July 17, 2014 01:00 IST