ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.29 - सीआयडीकडील महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपासात प्रगती असून लवकरच भंडारा धान्य घोटाळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. यासोबतच तुळजापूर आणि कोल्हापूर देवस्थानातील घोटाळ्यांचा तपासही प्रगतीपथावर असल्याची माहिती राज्याचे अतिरीक्त सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी दिली.
बक्षी पुण्याच्या एकदिवसाच्या दौ-यावर आलेले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. बक्षी म्हणाले ह्यसीआयडीमार्फत तपास सुरु असलेल्या भंडारा धान्य घोटाळ्याचा तपास पुर्ण झाला असून आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापुढे काही नविन पुरावे सादर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने हे पुरावे सत्र न्यायालयात सादर करुन आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार प्रक्रिया केली जाणार आहे. यासोबतच आण्णाभाऊ साठे महामंडळामधील घोटाळ्याचा 70 टक्के तपास पुर्ण झाला असून 30 टक्के तपास सुरु आहे. लवकरच या गुन्ह्यातही आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तुळजापूर आणि कोल्हापूर देवस्थानातील कथित घोटाळ्यांच्या तपासाच्या कागदपत्रांची पुर्तता करुन शासनाकडे अहवाल पाठवणार आहे.ह्ण
पुण्याची पोलीस व्यवस्था चांगली आहे. राज्यामध्ये आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात 35 टक्क्यांवरुन 54 टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या सीसीटीव्हीचे काम समाधानकारक सुरु आहे. केवळ साडेतीन टक्के खोदाई आणि कंपनीच्या तांत्रिक कारणांमुळे अडचण येत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आणखी कॅमेरे बसविण्यात येणार असून ते कायम राहतील असेही बक्षी यांनी स्पष्ट केले.
पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक घेऊन गुन्ह्यांचे प्रमाण, शिक्षेचे प्रमाण, सीसीटीव्ही, तसेच पोलिसांच्या घरांसंदर्भात माहिती घेतली. मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांसाठी एक लाख घरे देणार असल्याची घोषणा केली होती. लोहगाव येथे पाच हजार घरांची मेगा सिटी साकारत आहे. त्यांना आवश्यकत ती सर्व मदत देणार असून मुंबईमध्ये लवकरच यासंदर्भात एक बैठक बोलावण्यात येणार असल्याचे बक्षी यांनी सांगितले. बक्षी यांनी पोलीस आयुक्तालयासह स्वारगेट, औंध आणि शिवाजीनगर पोलीस वसाहतींना भेट दिली. यासोबतच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी)च्या अधिका-यांची बैठक घेतली. संध्याकाळी त्यांनी पोलीस मुख्यालयामध्ये मुद्देमाल प्रदान कार्यक्रमात उपस्थिती लावली.
--------
पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी करण्यात येत आहे. मात्र, आपल्याकडे अद्याप पुर्ण प्रस्ताव आलेला नाही. या मागणीवर शासनाच्या वरिष्ठ पातळीवर विचार झालेला नाही.
- के. पी. बक्षी, अतिरीक्त सचिव (गृह)