वाहतूककोंडी : ४० ते ५० जेसीबी, १० क्रेन घटनास्थळीघोडेगाव : सकाळी अकराच्या सुमारास माळीण येथे पहिले मदत पथक पोहोचले होते. या पथकातील धनंजय कोकने यांनी सांगितले, की तेथील दृश्य भयानक व अंगावर शहारे आणणारे होते. संपूर्ण गावच मातीखाली गाडले गेले. त्यामुळे शेकडो लोक त्यामध्ये मृत्युमुखी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. गावामध्ये मदत कार्यासाठी सुरुवातीला स्थानिक पोलीस आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते. सकाळी अकरापर्यंत मदतकार्य सुरू झालेले नव्हते. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांच्या माहितीनुसार सुमारे ४०० लोक या गावात असल्याचा संशय आहे. संपूर्ण गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दलदल निर्माण झाली आहे. गुडघ्यापर्यंत पाय चिखलात जात आहेत. त्यामुळे मदत पथकातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाताना अनेक अडचणी येत होत्या. गावात सुमारे ७५० ते ८०० लोक असल्याचा अंदाज आहे. सकाळी लवकर शेतात कामासाठी गेलेले लोक वगळता सर्व जण या मातीखाली गाडले गेल्याचा संशय आहे. प्रामुख्याने महिला व लहान मुलांचा त्यामध्ये समावेश आहे. दलदलीमुळे मदतीमध्ये अडचणी घटनेची माहिती समजल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या सर्व भागांतून अॅम्ब्युलन्स माळीणकडे रवाना झाल्या. गावाच्या परिसरात सुमारे १५० ते २०० अॅम्ब्युलन्स उभ्या आहेत. मात्र, या अॅम्ब्युलन्समुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर झाल्याने मदत कार्य तेथे पोहोचत नाही. तसेच, मदतीसाठी आलेले जेसीबी व क्रेनदेखील घटनास्थळी जाऊ शकत नव्हते. सध्या परिसरात सुमारे ४० ते ५० जेसीबी व १० क्रेन मदत कामासाठी आल्या आहेत. मात्र, पावसाचा जोर आणि दलदल झाल्याने त्यांना मदत करण्यासाठी जाता येत नव्हते. दोन ते तीन दिवसांनंतर सर्व दलदल कमी झाल्यानंतरच मृत्युमुखी पडलेल्यांचा निश्चित आकडा समजू शकेल, असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. माळीण याठिकाणी झालेल्या दुर्घटनेत जुन्नरच्या नवनिर्वाचित आदिवासी नगराध्यक्षा राणी शेळकंदे यांच्या मावशी व काका व त्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेत असण्याची शक्यता आहे. दरम्यान, नगराध्यक्षा राणी शेळकंदे यांच्याशी संपर्क केला असता, त्या म्हणाल्या, की मी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याठिकाणी प्रचंड गर्दी व वाहतूक समस्या असल्याने प्रत्यक्ष जागेवर जाता आले नसले, तरी परिस्थिती खूप भयानक असल्याचे समजते. (वार्ताहर)लहान मुले गेली वाहून सकाळी गावातील एका मंदिराजवळ काही मुले खेळत होती. त्यांना डोंगरावरून मोठ्या पाण्याच्या लाटा व माती येत असल्याचे दिसले. या लाटांमध्येच अनेक मुले वाहून गेली. अनेकांच्या डोक्यात दरडीतील दगड पडले. या जखमींना तातडीने अडिविरे गावातील रूग्णालयात दाखल केले आहे.
दलदलीमुळे मदतीमध्ये अडचणी
By admin | Updated: July 31, 2014 11:03 IST