कऱ्हाड : वडोली भिकेश्वर-धनकवडी (ता. कऱ्हाड) येथील बेकायदा वाळू ठेक्यावर महसूल विभागाने गुरुवारी छापा टाकला. यावेळी वाळू उपसा करणारी कोट्यवधींची यंत्रसामुग्री तसेच वाळूने भरलेले व रिकामे असे सुमारे ७० ट्रक जप्त करण्यात आले. तसेच वाळूचे ५२ वाफेही उद्ध्वस्त करण्यात आले. कृष्णा नदीपात्रात अडकलेल्या ३२ बोटी बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कऱ्हाड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथे बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती यापूर्वी तहसीलदारांना मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी कारवाईही करण्यात आली. त्यावेळी सुमारे ४२ वाफे बंद करण्यात आले होते. त्यानंतर वडोली भिकेश्वरमधील वाळू उपसा थांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही महिन्यांतच येथे ठेकेदारांनी डोके वर काढले. ही माहिती मिळताच गुरुवारी सकाळी महसूल विभागाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने छापा टाकला. पोकलॅन, जेसीबी, यांत्रिक बोटी, ट्रक, डंपर यासह इतर साहित्य पाहून अधिकाऱ्यांनाही धडकी भरली. या अनधिकृत ठिय्याची व्याप्ती मोठी असल्याने कारवाईस सुमारे दोन दिवस लागतील, असे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कऱ्हाडात वाळू ठेक्यावर छापा
By admin | Updated: June 11, 2016 04:05 IST