मुंबई : म्हाडा इमारत दुरुस्ती-पुनर्रचना मंडळाचे सभापती आणि सायन कोळीवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रसाद लाड यांचा प्रचार घराघरात व्हावा, त्यांचे कार्य प्रत्येकापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांच्या कुटुंबाने प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. यात त्यांच्या कन्या सायली आघाडीवर आहेत.शिक्षण, स्वच्छता, सुरक्षा, स्वास्थ्य, समृद्धी हे मुद्दे घेऊन मतदारसंघात लाड यांनी प्रचार सुरू केला आहे. प्रचारात त्यांना कार्यकर्त्यांसोबतच पत्नी नीता आणि कन्या सायली यांची मोलाची साथ मिळते आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नीता यांनी मतदारसंघात महिला बचत गटांचे जाळे विणले. त्या माध्यमातून सध्या नीता प्रचारात उतरल्या आहेत. याशिवाय त्या पदयात्रा आणि चौकसभाही घेत आहेत. सायन कोळीवाडा मतदारसंघातली बहुतांश जनता झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करते. नीता यांनी या झोपडपट्ट्यांमधल्या घराघरात लाड यांचे नाव व त्यांचे कार्य पोहोचविण्याचा निश्चय केला आहे. आम्ही कामे वाटून घेतलेली आहेत. ज्या ठिकाणी लाड जाऊ शकत नाहीत तेथे मी पोहोचते, असे नीता सांगत होत्या.लाड आणि त्यांच्या पत्नी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करीत आहेत, तर त्यांच्या कन्या सायली सोशल मीडियावरून आपल्या वडिलांचा प्रचार करीत आहेत. वडिलांचे कार्य, त्यांची राजकीय कारकिर्द, उद्याच्या प्रचाराचे शेड्युल याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती त्या फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅपवरून सर्वदूर पोहोचवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पक्षकार्यालयाशी आवश्यक असलेला समन्वयही त्याच ठेवत आहेत. (प्रतिनिधी)
प्रसाद लाड यांना प्रचारात कुटुंबाची मोलाची साथ
By admin | Updated: October 9, 2014 04:13 IST