वर्धा : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद शेंडे (७८) यांच्या पार्थिवावर रविवारी येथील इंदिरा सहकारी सूत गिरणीच्या परिसरात जनसमुदायाच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कणखर व परखड व्यक्तिमत्त्वाच्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे समर्थक व कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. सुमारे साडेपाच वर्षांपासून शेंडे आजारी होते. ते व्हिलचेअरवर असतानाही कार्यकर्त्यांना जनतेची कामे जोमाने करण्याची ऊर्जा देत होते. साडेतीन वर्षांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली. २५ आॅक्टोबरला त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नागपूर येथील वोक्हार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारी रात्री त्यांचे पार्थिव वर्धा येथे स्नेहल नगरातील निवासस्थानी आणण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी शेंडे यांचे पुत्र रवी, शेखर व आकाश यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून शोक व्यक्त केला. प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुष्पचक्र्र अर्पण करीत आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)
प्रमोद शेंडे अनंतात विलीन
By admin | Updated: November 16, 2015 03:28 IST