नाशिक : उद्योगाला स्वस्त दरात वीज देण्याचे सरकारचे धोरण राहणार असून, त्यासाठी व्यापक धोरण निश्चित करावे लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत विजेचे दर जास्त असल्याने उद्योजक येथे येत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.महाराष्ट्र राज्य कामगार महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘उद्योजक, व्यापारी आणि ग्राहकांना स्वस्त दरात वीज मिळाली पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. वीज कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य यात महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी अनुदानामुळे सुमारे ८ हजार कोटींचा भार उद्योजकांवर पडतो. ही विसंगती दूर होणे अपेक्षित आहे. विजेची गळती हे सर्वांत मोठे आव्हान आहे. वीज क्षेत्रात तीन कंपन्या असल्या तरी त्या एकच आहेत, केवळ कंपनीकडे बोट दाखवून चालणार नाही तर कर्मचाऱ्यांनीही कार्यकुशलता आणि क्षमतेतून त्यांच्या विकासाला हातभार लावला पाहिजे,’’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई यांनी प्रास्ताविक केले. भारतीय मजदूर महासंघाचे उपाध्यक्ष के. लक्ष्मा रेड्डी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदी या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उद्योगाला स्वस्त दरात वीज देण्याचे धोरण
By admin | Updated: December 27, 2014 04:24 IST