- स्नेहा मोरे, मुंबईप्रत्येकाच्या घरी पत्र वाटत फिरणारे खाकी कपड्यातील पोस्टमन काळाच्या ओघात कुठे तरी हरवल्याची जाणीव होत असली तरी आजमितीसही हे पोस्टमन दररोज तब्बल ४० ते ५० मजले चढ-उतार करतात. शिवाय, पत्र पोहोचवण्यासाठी एका पोस्टमनला दिवसाला १६ किलोमीटर सायकलचीही रपेट मारावी लागते. त्यामुळे जागतिक टपाल दिन आणि राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने व्हॉट्सअॅपच्या जमान्यातही पोस्टाची विश्वासार्हता याच त्यांच्या शिलेदारांमुळे टिकून असल्याची प्रचिती येते. ‘डाकिया डाक लाया, खुशी का पैगाम कही दर्दनाक लाया’ हे गाणे प्रत्येकाला पोस्टाच्या काळात घेऊन जाते. परंतु, पोस्टाचा काळ हवाहवासा वाटला तरीही याची दुसरी बाजू म्हणजे अजूनही टपाल विभागाने कात टाकलेली नाही. आजही उन्हातान्हात, पाऊस-पाण्यात पोस्टमन्सना पत्र पोहोचवण्यासाठी दारोदारी फिरण्याशिवाय गत्यंतर नाही. एकीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी देश-विदेशात ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत असताना दुसरीकडे टपाल विभाग मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापासून अद्यापही कोसो दूर आहे.महाराष्ट्रात आजच्या घडीला जवळपास ६ हजार ५०० पोस्टमन टपाल विभागात कार्यरत आहेत, तर ग्रामीण भागात जवळपास अर्धवेळ पोस्टमन म्हणून काम करणारे १० हजार ५०० पोस्टमन्स आहेत. त्यात मुंबई शहर-उपनगरात सुमारे २ हजार २०० पोस्टमन आहेत. याशिवाय, टपाल विभागात आजही अनेक जागा रिक्त असल्याचे मुंबई जीपीओच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. सध्याचा जमाना हा इंटरनेट, ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगचा आहे. प्रिय व्यक्तीशी संपर्क करणे अगदी एका क्लिकवर आले आहे. मात्र हा संपर्क सोपा झाला असला तरी त्यातला जिव्हाळा कमी झाल्याचे जाणवते. त्यामुळे टपाल विभागाने आता कात टाकण्याची गरज आहे. विद्यार्थी घेणार ‘वॉकिंग टूर विथ पोस्टमन’चा अनुभव राष्ट्रीय टपाल सप्ताह आणि जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ‘वॉकिंग टूर विथ पोस्टमन’ हा अनुभव घेता येणार आहे. भारतीय टपाल विभाग आयोजित राष्ट्रीय टपाल सप्ताह अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.राष्ट्रीय टपाल सप्ताहात ९ आॅक्टोबर रोजी, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता जनरल पोस्ट आॅफिस कार्यालयात जागतिक टपाल दिनाच्या विशेष कव्हरचे अनावरण करण्यात येणार आहे. शिवाय, १० आॅक्टोबर रोजी ‘सेव्हिंग बँक डे’ साजरा करण्यात येणार आहे. त्यात या विभागातील विविध बचत खात्यांविषयी ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे. याविषयी जनरल पोस्ट आॅफिस कार्यालयात गुरुवारी मुख्य पोस्टमास्टर जनरल अशोक कुमार दाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. १२ आॅक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसोबत टपाल सप्ताह साजरा करण्यात येईल. त्यात महाराष्ट्र आणि गोव्यातील हेरिटेज वास्तूंमध्ये ‘वॉकिंग टूर विथ पोस्टमन’ हा उपक्रम राबविण्यात येईल. शिवाय, या वेळी शालेय विद्यार्थ्यांना पत्ते लिहिण्याविषयी, पत्रलेखनाचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. तर १३ आॅक्टोबर रोजी ‘फिलेटेली’ उपक्रमांतर्गत माय स्टॅम्प योजना राबविण्यात येईल. यात ग्राहकांना आपल्या छायाचित्राचे पोस्ट तिकीट बनवून मिळणार आहे. या सप्ताहांतर्गत मोबाइल स्टॅम्प प्रदर्शन, पीएलआय दिन साजरा करण्यात येणार आहे.
दिवसाला ५० मजले चढतो पोस्टमन!
By admin | Updated: October 9, 2015 03:23 IST