मुंबई : काँग्रेस सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या प्रचार पुस्तिकांचे प्रकाशन रविवारी काँग्रेस प्रदेश कार्यालयात करण्यात आले.गांधी भवन येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे व निवडणूक समन्वय समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्या उपस्थित या हा कार्यक्रम झाला.माहिती आणि व्यंगचित्रांचा समावेश असणाऱ्या या पुस्तिकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि मोदी सरकारवर टीका करण्यात आली. पहिल्या पुस्तिकेत मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून आपल्या आश्वासनांवरून कशाप्रकारे घूमजाव केले याची माहिती देण्यात आली आहे. भाजपा सरकार सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी निव्वळ मोठमोठ्या वल्गना करीत आहे. मोदी सरकारला कोणतीच नवी योजना आणता आली नाही. सत्तेत आल्यापासून काँग्रेसने सुरू केलेल्या योजनांची नावे बदलण्याचीच मोहीम चालविण्यात येत आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. तर दुसऱ्या पुस्तिकेत पक्षकार्यकर्त्यांनी जनतेसमोर जाताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. साठ वर्षांतील काँग्रेस पक्षाचे योगदान, आघाडी सरकारची महत्त्वाची माहिती देतानाच आगामी विधानसभा जिंकण्याचा निर्धार या पुस्तिकेत व्यक्त करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल
By admin | Updated: September 8, 2014 02:55 IST