शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

शिवसेना नावाचा राजकीय अपवाद

By admin | Updated: June 19, 2016 05:26 IST

प्रामुख्याने राजकारणाचे अभ्यासक व मुरब्बी राजकीय नेत्यांचा बाळासाहेब आहेत तोपर्यंतच शिवसेना टिकून राहिल हा अंदाज गेल्या साडेतीन वर्षात खोटा पडला आहे

- भाऊ तोरसेकर 
 
मुंबई, दि. 19 -  बाळासाहेब आहेत तोपर्यंतच शिवसेना टिकून राहिल. त्यांच्यानंतर या संघटना वा पक्षाला भवितव्य नाही, असे बहुतेकांना वाटत होते. प्रामुख्याने राजकारणाचे अभ्यासक व मुरब्बी राजकीय नेत्यांचा तो अंदाज, गेल्या साडेतीन वर्षात खोटा पडला आहे. कारण बाळासाहेबांना जाऊन आता तितका काळ उलटला असून, शिवसेना आजही त्याच जोमाने राजकारणात व सार्वजनिक जीवनात ठामपणे उभी आहे. किंबहूना बाळासाहेबांनी स्वबळावर विधानसभा लढवण्याचा प्रयत्नही केला नव्हता. उद्धव ठाकरे यांना ते धाडस करावे लागले आणि त्यांनी ते यशस्वीरित्या पार पाडून दाखवले. देशात मोदी लाट असताना एकाकी लढून त्यांनी राज्यातला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असल्याचे सिद्ध केले. ही किमया अर्थातच उद्धव यांच्या नेतृत्वगुणांची आहे असेही मानायचे कारण नाही. कारण शिवसेना व अन्य राजकीय पक्ष यात मोठा फ़रक आहे. अन्य राजकीय पक्षांप्रमाणे शिवसेना कुठल्या एका राजकीय विचाराने बांधलेली नाही, किंवा वैचारिक भूमिकेने तिची स्थापना झालेली नाही. तात्कालीन परिस्थितीने शिवसेना जन्माला आली आणि इतिहासाने जबाबदारी टाकली ती निभावतांना त्या संघटनेचा राज्यव्यापी पक्ष होत गेला. तिची वाटचालच इतिहासाने घडवून आणलेली आहे.
 (शिवसेनेची स्थापना आणि सुरुवातीचा काळ)
ज्या संयुक्त महाराष्ट्र समितीने मराठी भाषिक राज्य मिळवून दिले, तिच्यात सहभागी असलेल्या पक्षांनी ती राजकीय आघाडी त्याच भूमिकेतून पुढे चालवली असती, तर कदाचित शिवसेना जन्माला आलीच नसती. पण जेव्हा मराठी भषिक राज्य स्थापन होण्याचे निश्चीत झाले आणि समितीतले राजकीय मतभेद उफ़ाळून आले. तेव्हा बिगरकॉग्रेसी राजकारणाचे नेतृत्व समिती करीत होती. मुंबईच्या मराठी माणसाला समिती हाच मोठा आधार वाटत होता. तीच समिती मोडकळीस आली आणि तिची जागा व जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी होती. त्यातून शिवसेनेचा जन्म झाला. म्हणूनच पुढली दोन दशके शिवसेना मुंबई ठाण्यापुरती मर्यादित राहिली. स्थानिक पातळीवर सेनेला उचलून धरणारा मतदार, विधानसभा लोकसभेसाठी सेनेला मते देत नव्हता. पण पुढल्या काळात शिवसेना ही महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता म्हणून गरज बनली आणि तो राज्यव्यापी पक्ष होऊन गेला. समिती ही महाराष्ट्रातील कॉग्रेससाठी राजकीय पर्याय होता. ती ऐतिहासिक जबाबदारी समितीतल्या पक्षांना पेलता आली नाही आणि हळुहळू शिवसेना राज्यातल्या बिगरकॉग्रेसी राजकारणाचा केंद्रबिंदू होत गेला. ज्यांनी सेनेला आरंभीच्या काळात कॉग्रेसची बटीक ठरवले, त्यांनीच पुढल्या काळात सेनेला थोपवण्यासाठी कॉग्रेसशी हातमिळवणी करून, आपले अवतारकार्य संपवले. अशी जी बिगरकॉग्रेसी राजकारणाची जागा अन्य पक्ष मोकळी करीत गेले, तिथे पर्याय म्हणून शिवसेना वाढत गेली आणि अखेरीस राज्यव्यापी पक्ष बनली.
 (शिवसैनिकांची हक्काची जागा शिवसेना भवन)
दोन दशके मुंबई ठाण्यातच अडकून पडलेल्या शिवसेनेला राज्यात कुठेही प्रसार विस्तार करता आला नव्हता. १९७७ नंतर शरद पवार बिगरकॉग्रेसी राजकारणात आले आणि त्यांनी त्या राजकारणाची सुत्रे हाती घेतली. पुढल्या काळात तात्कालीन बिगरकॉग्रेसी पक्ष पवारांच्या इतके आहारी गेले, की आपले भिन्न अस्तित्व वा नेतृत्व जपू शकले नाहीत. त्यामुळेच १९८६ अखेरीस शरद पवार पुन्हा कॉग्रेसवासी झाले आणि महाराष्ट्रातले बिगरकॉग्रेसी राजकारण पोरके होऊन गेले. त्याची सुत्रे मग शिवसेनेच्या हाती आली. कारण पवार गेल्यावर ती सुत्रे हाती घेण्यास शेकाप, जनता दल, कम्युनिस्ट इत्यादी प्रचलित पक्षात नेतृत्वच शिल्लक राहिले नव्हते. पर्यायाने मुंबई ठाण्यापलिकडे वसलेला कॉग्रेसविरोधी कार्यकर्ता नवे नेतॄत्व शोधू लागला आणि त्याला बाळासाहेब ठाकरे वगळता कोणी नेता दिसतच नव्हता. त्यानंतरच्या दोन वर्षात शिवसेना महाराष्ट्रव्यापी राजकीय पक्ष होऊन गेली. थोडक्यात १९६६ सालात मुंबईतली समिती विस्कटली आणि तिच्यामागे असलेल्या तरूणाने शिवसेनेचे स्वरूप धारण केले होते. त्याचीच पुनरावृत्ती १९८६ नंतर महाराष्ट्रभर झाली. दोन दशकापुर्वी मुंबईत समितीच्या भूमिकेने भारावलेल्या मराठी तरूणाला समितीतील पक्षांनी निराश केले होते. त्यालाच ‘मार्मिक’मधून बाळासाहेबांनी चुचकारले आणि त्याने या व्यंगचित्रकाराला राजकीय नेता म्हणून उभे केले. शिवसेना स्थापन करायला भाग पाडले होते. दोन दशकांनंतर १९८६ अखेरीस पवारांनी तशाच तरूणाकडे पाठ फ़िरवून कॉग्रेसची वाट धरली. त्यांच्यासोबत आमदार कॉग्रेसमध्ये गेले, तरी तरूणवर्ग निराश झाला होता. त्याने बाळासाहेबांमध्ये नेतृत्व आणि शिवसेनेमध्ये राजकीय पर्याय बघितला. 
बारकाईने बघितले तर असे दिसेल, की पन्नास वर्षापुर्वी समिती फ़ुटण्यातून मुंबईत पर्यायाची गरज निर्माण झाली आणि बाळासाहेबांनी नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतली. तीच स्थिती वीस वर्षांनी महाराष्ट्रभर उदभवली आणि पुन्हा इतिहासानेच शिवसेनेला राज्यव्यापी पक्ष बनणे भाग पडले. पन्नास वर्षाचा सेनेचा कालखंड बघितला तर योजना आखून, कार्यक्रम योजून पक्षाचा विस्तार असा शिवसेनेने कधी केला नाही. अभ्यासवर्ग भरवून किंवा कार्यकर्त्यांची शिबीरे योजून संघटना उभी केली नाही. नेतृत्व विकासाचे वर्ग भरवले नाहीत. ठराव संमत करून आंदोलने छेडली नाहीत. परिस्थितीला सामोरे जाताना जे काही करावे लागले, त्यातून शिवसेना वाढत राहिली व जनमानसात रुजत गेली. अन्य कुठल्याही राजकीय पक्ष वा संघटनेशी म्हणूनच सेनेची तुलना होऊ शकत नाही. तो भारतीय राजकारणातला अपवाद आहे. कारण अन्य कुठल्या मुळ संघटनेतून बाजूला होऊन तिची स्थापना झाली नाही, की कुठल्या विचारसरणीला बांधून घेऊन तिची वाटचाल झालेली नाही. १९८४ सालात कॉम्रेड डांगे यांच्या प्रेरणेने काही डावे विचारवंत बाळासाहेबांना मार्क्सवाद शिकवायला मातोश्रीवर जात होते आणि त्यानंतर काही महिन्यातच ठाकरे यांनी हिंदूत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन भाजपालाही थक्क करून टाकले. हे आजच्या अनेक संपादक विश्लेषकांनाही ठाऊक नसेल. त्याच दरम्यान गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी शिवाजीपार्कच्या मेळाव्यात जॉर्ज फ़र्नांडीस व शरद पवारही शिवसेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावून गेल्याचे कितीजणांना आठवते? 
 
१९८४-८५ च्या लोकसभा विधानसभा निवडणूकीत सडकून आपटी खाल्ल्यावर शिवसेनाप्रमुखांनी स्वबळावर मुंबई महापालिकेच्या सर्व जागा लढवल्या आणि एकट्याने सत्ता काबीज केली. तिथून सेना कात टाकून उभी राहिली. सेनेतले प्रस्थापित नेते मागे पडले आणि दुसर्‍या पिढीचे नेतृत्व पालिकेचे काम करायला पुढे आले. त्यांनीच नंतर राज्यभर सेनेच्या शाखा उघडण्याचा सपाटा लावला व पवारांच्या कॉग्रेसवासी होण्याने त्याला मोठी चालना मिळाली. विशीतल्या सेनेने तेव्हा पहिली कात टाकली होती. गेल्या विधानसभा निवडणूकीत स्वबळावर महाराष्ट्र लढण्याची सक्ती झाली आणि त्यातून दुसर्‍यांदा सेनेने कात टाकली आहे. बाळासाहेबांनीही कधी महाराष्ट्रभर उमेदवार उभे करण्याचे धाडस केले नव्हते, ते उद्धवला करावे लागले आणि त्यांनी ६३ आमदार निवडून आणले. ती संख्या दुय्यम आहे. त्या निकालांनी बाळासाहेबांच्या जमान्यातील उरल्यासुरल्या नेत्यांचा सेनेतील प्रभाव संपुष्टात आणला. पंधरा वर्षे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सेनेचे नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे, पित्याच्या छायेत आणि युतीच्या जोखडाखाली होते. ते त्यातून मुक्त झाले आणि आज सेनेचे तेच निर्विवाद एकमुखी नेता बनून गेले आहेत. तिसर्‍या पिढीतले शिवसैनिक आज पक्षाचे नेतृत्व करायला पुढे आलेले आहेत. युती तुटली नसती, तर उद्धवचे नेतृत्व झाकोळलेले राहिले असते आणि आजच्या यशाचा तुरा त्यांना माथी मिरवता आला नसता. १९६६, १९८६ आणि २०१४ हे शिवसेनेच्या वाटचालीतले ऐतिहासिक टप्पे आहेत. किंबहूना बाळासाहेबांच्या नंतर सेनेचे काय होणार, याचे उत्तर त्याच इतिहासाने दिले आहे. युती तुटली नसती तर त्याचे उत्तर मिळाले नसते. एकप्रकारे युती तुटणे उद्धवच्या पथ्यावर पडले असे म्हणता येईल. कारण आता पित्याच्या पुण्यईवर जगण्याची पुत्राला गरज उरलेली नाही. मात्र इतिहासाचे आव्हान पेलण्याची हिंमत व संयम त्याला दाखवता आला पाहिजे.