धानोरा (जि. गडचिरोली) : चहा पिण्यासाठी चौकातील हॉटेलमध्ये बसलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर नक्षल्यांनी गोळीबार केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. सदर घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास धानोरा तालुका मुख्यालयापासून ४२ किमी अंतरावर असलेल्या सावरगाव येथे घडली. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन मोहिते (३५), चंद्रकांत पाटील (३६), अशी जखमी अधिकाऱ्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार सावरगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन मोहिते व चंद्रकांत पाटील हे दोघे दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे चहा घेण्यासाठी चौकातील हॉटेलमध्ये आले. दरम्यान, साध्या वेशातील तीन नक्षल्यांनी चौकात हॉटेल जवळ येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये दोनही पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले. या दोघांना पोलीस विभागाने तत्काळ हेलिकॉप्टरच्या साहाय्याने गडचिरोलीवरून नागपूरच्या दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सावरगाव पोलीस मदत केंद्रापासून सदर घटनास्थळ केवळ १०० मीटर अंतरावर आहे. अर्जुन मोहिते व चंद्रकांत पाटील गेल्या तीन वर्षांपूर्वी मुरूमगाव पोलीस मदत केंद्रात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. २०१३ मध्ये सावरगाव येथे नव्याने पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले. मोहीते व पाटील यांची सावरगाव पोलीस मदत केंद्रात बदली करण्यात आली. अर्जुन मोहिते हे कोल्हापूर जिल्ह्यातील तर चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. पोलीस मदत केंद्राच्या हाकेवरील अंतरावर भर चौकात नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे परिसरात नक्षल्यांची दहशत पसरली आहे. (प्रतिनिधी)
पोलीस अधिकाऱ्यांवर नक्षल्यांचा गोळीबार
By admin | Updated: August 7, 2014 00:56 IST