मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणीसह तिच्या आईला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. मारहाणीच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी घटनेची चौकशी करुन दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले आहे. मीरारोड येथील नंदिनी गोस्वामी शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास आई, वडिलांसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती. सामान्य नागरिकांच्या रांगेत उभी असताना व्हीआयपी प्रवेशद्वारातून नागरिक जातात हे पाहून तिनेही व्हीआयपी गेटकडे धाव घेतली. मात्र तेथे तैनात असलेल्या महिला पोलिसांनी तिच्या आईला धक्काबुक्की करत बाहेर काढले. त्यात त्यांचे कपडे फाटले. आईला मारहाण केल्यानंतर नंदिनीने पोलिसांकडे जाब विचारण्यास सुरुवात केली. नंदिनीच्या आक्रोशाने तेथील महिला पोलिसांनी तिला एखाद्या अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. चारही बाजूने महिला पोलीस तिला मारहाण करत होते. नंदिनीच्या बचावासाठी तिच्या वडिलांनी तिला कवेत घेतले तर आईनेही मदतीसाठी पुढाकार घेतला असता, महिला पोलिसांनी आईलाही बेदम मारहाण केली. इतर पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. मारहाण करतच तिला काळाचौकी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे तिला १,२०० रुपयांच्या दंड करुन रात्री अडीचच्या सुमारास सोडण्यात आले.चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जावेद यांनी ‘लोकमत’ला दिली. घटनेबाबत खंत व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना ४८ तासांत अहवाल सादर करत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)
लालबागच्या राजासमोर पोलिसांची तरुणीला मारहाण
By admin | Updated: September 29, 2015 01:59 IST