ठाणे : घाटकोपरच्या पंतनगर भागातून अपहरण केलेल्या रिया सुनील गुप्ता (६) या मुलीची ठाणे शहर वाहतूक शाखेचे हवालदार जुबेर तांबोळी यांनी सुटीवर असतानाही रामबिलाल प्रजापती (२५, रा. घाटकोपर) याच्या ताब्यातून सुटका करून त्यालाही मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. खासगी कामासाठी पुण्याला निघालेल्या तांबोळींनी बजावलेल्या कर्तव्याबद्दल पोलीस दलात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.वाहतूक उपशाखा कोपरी येथे नेमणुकीस असलेल्या तांबोळी यांची ३१ मे रोजी साप्ताहिक सुटी होती. त्याच दिवशी त्यांच्या मामेभावाचा पुण्यात साखरपुडा होता. त्यासाठी पहाटे ५.३० वा.च्या सुमारास रेल्वेने अंबरनाथ आणि तिथून नंतर नातेवाइकांसमवेत ते पुण्याला जाणार होते. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट-२ च्या पुलावर ते रेल्वेची वाट पाहत असताना त्यांच्या समोरून हे दोघेही जाताना दिसले. या दोघांनाही कुठेतरी पाहिल्यासारखे त्यांना जाणवल्याने त्यांनी मोबाइल तपासला. त्यांच्या व्हॉट्सअॅपवर उपनिरीक्षक आर.के. सोनगिरे यांनी अपहरण झालेल्या रिया आणि रामबिलाल यांचा फोटो पाठविला होता. फोटो आणि त्या दोघांमधील साम्य आढळल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. या तरुणाच्या हालचाली संशयास्पद आढळल्यामुळे तांबोळींनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्यांच्याशी त्याने झटापट केली. त्यांनी मदतीचे आवाहन करूनही कोणीही प्रवासी पुढे आला नाही. त्याला तसेच पकडून वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणि नंतर रेल्वे पोलीस ठाण्यात नेले. रियाचे २७ मे रोजी सायंकाळी ६.३० वा.च्या सुमारास कामराज मार्ग येथील प्रेमा किराणा स्टोअर्स येथून त्याने अपहरण केले होते. त्याबाबतचा पंतनगरमध्ये गुन्हाही दाखल आहे. प्रेमा किराणासमोरील सीसीटीव्हीमुळे व्हॉट्सअॅपवरून त्यांचा फोटोही पोलिसांकडून व्हायरल झाला होता. ठाण्यात मिळालेल्या रियाचा फोटो रेल्वे पोलिसांनी पंतनगर पोलिसांना व्हॉट्सअॅप केल्यावर ही तीच मुलगी असल्याची खात्री झाली. पंतनगरचे सहायक पोलीस निरीक्षक डुकले यांनी ठाणे गाठून तिला ताब्यात घेतले. तेव्हा त्यांनाही मोठा आनंद झाला. चार पथकांद्वारे उत्तर प्रदेशपर्यंत मुंबई पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत होता. त्यामुळे ठाणे पोलिसांच्या एका शिपायाने केलेल्या कामगिरीबद्दल मुंबई पोलिसांनीही तांबोळींचे कौतुक केले.
व्हॉट्सअॅपमुळे पोलिसाने केली चिमुरडीची सुटका
By admin | Updated: June 1, 2015 08:47 IST