ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २१ - गोविंद पानसरेंवरील हल्ला ही दुर्दैवी घटना असून या हल्ल्यासाठी पोलिसांना दोष देऊन चालणार नाही असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. पानसरेंवरील हल्ल्याने व्यवस्थेला आव्हान दिले असून हे आव्हान मोडून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर पाच दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे दिवसाढवळ्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळ काढला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोविंद पानसरे यांना शुक्रवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र शुक्रवारी रात्री उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नरेंद्र दाभोलकर यांचे मारकेरी शोधण्यात महाराष्ट्र पोलिस अपयशी ठरत असतानाच पानसरे यांच्यासारख्या विचारवंताची हत्या झाली. यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांची पाठराखण केल्याचे दिसते.
नाशिकमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी पानसरे यांच्यावरील हल्ल्यासाठी पोलिस जबाबदार नाही असे सांगितले. हा हल्ला व्यक्ती किंवा विचारांवरील हल्ला नसून हा हल्ला म्हणजे व्यवस्थेला दिलेले आव्हान आहे असे फडणवीस यांनी नमूद केले. पोलिसांनी ताकद लावल्यास लवकरच मारेकरी सापडतील असेही त्यांनी स्पष्ट केले.