मुंबई : भारतात पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलेल्या पी-वन पॉवरबोट रेसिंगला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला. मरिन ड्राइव्हच्या समुद्रकिनारी रंगलेल्या या शर्यतीदरम्यान मुंबईकरांनी समुद्री वेगाचा थरार अनुभवला. दरम्यान, बूस्टर जेट्सच्या सॅम आणि डेसी या कोलमन भावंडांनी स्पर्धेच्या पात्रता फेरीत वर्चस्व राखताना शनिवारी रंगणाऱ्या पहिल्या शर्यतीसाठी पोल पोझिशन मिळवली.ड्रायव्हर म्हणून सहभागी झालेल्या सॅमला डेसीने नेव्हीगेटर (दिशादर्शक) म्हणून उत्तम साथ दिली. या दोघांनी २:२५.७३ मिनिटांची सर्वोत्तम वेळ देत पोल पोझिशन मिळवली. विशेष म्हणजे कोलमन भावंडांना मनीआॅनमोबाइल मर्लिन्स संघाच्या जेम्स नॉर्विल आणि ख्रिस्तियन पार्सन्स-यंग यांच्याकडून कडवी लढत मिळाली. अवघ्या शतांशच्या फरकाने जेम्स - ख्रिस्तियन यांना दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यांनी २:२५.७४ मिनिटांची वेळ नोंदवली.त्याचवेळी, पात्रता फेरीत सी. एस. संतोष आणि गौरव गिल या भारतीयांच्या कामगिरीवर सर्वांची नजर होती. बूस्टर संघाकडूनच सहभागी झालेल्या संतोषने जबरदस्त सुरुवात करताना नेव्हिगेटर मार्टिन रॉबिन्सनच्या साथीने आघाडी मिळवली होती. मात्र नंतर हळूहळू तो मागे पडू लागला. वेगात वळण घेण्याच्या प्रयत्नात लाटांमुळे संतोषच्या वेगावर परिणाम झाल्याने त्याला उत्कृष्ट वेळ नोंदवण्यात अपयश आले. संतोषने २:३१.५५ अशा वेळेसह नववे स्थान पटकावले. स्पर्धेतील दुसरा भारतीय गौरव गिलने मात्र काहीशी छाप पाडताना सातवे स्थान मिळवले. अल्ट्रा शार्क संघाच्या गौरवने नेव्हीगेटर जॉर्ज इवे याच्यासह २:३०.६० मिनिटांची वेळ नोंदवली. पहिल्या फेरीच्या अंतिम वळणावर गौरवला देखील लाटांच्या अडचणींचा सामना करावा लागला. वेगवान वाऱ्यासह पॉवरबोटवर नियंत्रण राखणे सोपे जात नसल्याने गौरवच्या वेगावरही मोठा परिणाम झाला. तरी, शनिवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीमध्ये मात्र चांगली कामगिरी करु असा विश्वास गौरवने व्यक्त केला. (क्रीडा प्रतिनिधी)>आज रंगणार कोळी होड्यांची शर्यत...स्पर्धेचा दुसरा दिवस विशेष असून यावेळी दर्याचा राजा असलेला आणि मुंबईचा भूमिपुत्र म्हणून ओळखला जाणाऱ्या कोळी बांधवांची अनोखी शर्यत रंगेल. पहिल्यांदाच कोळी बांधवांच्या होड्यांची शर्यत रंगणार असून मुंबईकरांमध्ये या स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. त्याचबरोबर बोट सजावटीची विशेष स्पर्धाही यावेळी रंगेल. दरम्यान, या विशेष शर्यतीसाठी सुमारे एक हजार कोळी बांधव उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवतील, असा विश्वास दक्षिण मुंबई कोळी महासंघाचे अध्यक्ष रोहिदास कोळी यांनी व्यक्त केला आहे.>‘विराट’ चषक.. : भारताची ऐतिहासिक युध्दनौका ‘आयएनएस विराट’ देशाच्या सेवेतून निवृत्त होत असली तरी, पी१ पॉवरबोटच्या स्पर्धेनिमित्त ही युध्दनौका अनेकांना प्रेरणा देईल. या स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणारा चषक विराट युध्दनौकेच्या पत्र्यापासून तयार करण्यात आलेला असून भारताचे पश्चिम नौदलाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल गिरिष लुथरा यांच्या हस्ते या आकर्षक चषकाचे अनावरण करण्यात आले.>पी-वन पॉवरबोट स्पर्धेतील विजयी संघाला प्रदान करण्यात येणाऱ्या ‘विराट’ चषकाचे अनावरण करताना महाराष्ट्र पर्यटन मंत्री जयकुमार रावल (डावीकडे) आणि व्हाइस अॅडमिरल गिरिष लुथरा.
कोलमन भावंडांनी मिळवली पी-वन पोल पोझिशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 05:08 IST