जुन्नर (पुणे) : शालेय पोषण आहाराबरोबरच प्रसाद म्हणून शिळा शिरा दिल्याने बल्लाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ३१ विद्यार्थी व विद्यार्र्थिनींना विषबाधा झाली असून, त्यांच्यावर जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दोन शिक्षिका आणि एका पालकावरही उपचार सुरू आहेत. सोमवारी दुपारी मुलांना पोषण आहार दिल्यानंतर आहार बनविणाऱ्या सुरेखा डोंगरे यांनी त्यांच्या घरी २१ जूनला झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचा प्रसाद मुलांना दिला़ संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मुले घरी गेली़मात्र, दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी शाळा भरल्यानंतर विद्यार्थी संख्या कमी असल्याचे वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांच्या लक्षात आले़ त्यांनी मुलांच्या घरी जाऊन पालकांना विचारणा केली तेव्हा अनेक मुलांना सोमवारी रात्रीपासून उलटी, जुलाब, चक्कर येत असल्याचे त्यांना समजले. शाळेतील ८७पैकी ७० मुलांना आहाराचा त्रास झाला़ त्यामुळे पालक व शिक्षकांची पळापळ सुरू झाली़ उपसरपंच संजय नायकोडी यांनी तत्काळ रुग्णवाहिका मागवली व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर डॉ. शिंगोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले़ दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्याम बनकर यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Updated: June 24, 2015 01:30 IST