मुंबई : राज्यात दुष्काळासारखा गंभीर प्रश्न असतानाही सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेचा भंपकपणा सुरू आहे. प्रत्येक बाबतीत सतत खोटे बोलत राहण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपा राबवित असून विहिरींच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या खिशात घालण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. दुष्काळी भागात ३३ हजार विहीरी खोदल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. प्रत्यक्षात मुख्यमंत्री कार्यालयासह सरकारच्या कोणत्याच विभागाकडे या विहिरींची माहिती उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे, असे राज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुढी पाडवा मेळाव्यात आपण राज्य सरकारला ३३ हजार विहिरींचे पुरावे दाखविण्याची मागणी केली होती. यावर, या विहिरींची, त्याच्या लाभार्थ्यांच्या नाव-पत्त्यासह नोंद उपलब्ध असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाकडे माहिती अधिकारात विहिरींचा तपशील विचारला. यावर तशी माहितीच मुख्यमंत्री कार्यालयाकडे नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले, असे सांगून ते म्हणाले, असाच प्रकार जलसंधारण, जलसंपदा, नियोजन आणि रोहयो या सर्व विभागांनी विहिरींबाबत माहिती नसल्याचे लेखी उत्तर दिले आहे.शासनाचा कोणताच विभाग या विहिरींची नोंद ठेवत नसेल तर मुख्यमंत्री कोणत्या हिमतीने आणि अधिकाराने विहिरींची तसेच त्यांच्या लाभार्थ्यांची नावे, पत्ते देण्याची भाषा करतात, असा सवाल त्यांनी केला. या केवळ कागदावरच आहेत. अनेक ठिकाणी जुन्या विहिरींभोवती कठडे बांधून विहीर खोदल्याचा खोटारडेपणा केल्याचे राज यांनी सांगितले. १ मे रोजी हुतात्मा चौकात सजावट होतेच. पालिका आणि राज्य सरकारच्या वादात १ मे रोजी हुतात्मा चौकात सजावट झाली नाही. हा हुतात्म्यांचा अपमान असून भाजपा आणि शिवसेनेने याबाबत जनतेची माफी मागायला हवी, असे राज म्हणाले. (प्रतिनिधी)सामंजस्य कराराचा देखावाप्रत्येक विषयात सतत खोटे बोलत राहण्याचे धोरण भाजपाकडून राबविले जात आहे. मेक इन इंडिया सप्ताहात परदेशी भांडवल मिळवून देण्याच्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यातून छोट्या उद्योजकांना गोळा करण्यात आले. ज्या उद्योजकाने २ कोटींची मागणी केली त्याच्यासोबत २०० कोटींचा तर ६ कोटींची मागण्या करणाऱ्या उद्योजकासोबत ६०० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. अशा भंपकबाजीतून दीड लाख कोटींच्या सामंजस्य करार झाल्याचा देखावा उभारला गेल्याचा आरोप राज यांनी केला. फडणवीसांनी राजीनामा द्यावावेगळ्या विदर्भासाठी मतदान करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा अधिकार आहे का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. स्वत: फडणवीस अथवा सरकार विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट करत नाहीत. अॅड. श्रीहरी अणे आणि मा. गो. वैद्यांच्या माध्यमातून अंदाज घेतला जात आहे. आधी विदर्भ, मग मराठवाडा आणि शेवटी मुंबईच महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज यांनी केली.‘लोकमत’चा दाखला : मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांतील १०० विहिरींची प्रत्यक्ष पाहणी करून ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेला ग्राऊंड रिपोर्ट पुरेसा बोलका असून सरकारच्या दाव्याचा पोलखोल करणारा आहे, असे राज यांनी सांगितले.
निधी कंत्राटदारांच्या खिशात
By admin | Updated: May 3, 2016 04:12 IST