मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन : उड्डाण पूल, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचाही शुभारंभ नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये २१ आॅगस्टला येण्याची शक्यता भाजप वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी त्याला दुजोरा दिला आहे.विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांच्या हस्ते नागपूरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मेट्रो रेल्वेसह शहरातील पारडी व काही उड्डाण पूल तसेच बुटीबोरी- तुळजापूर या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे त्यांच्या हस्ते वर्धा येथील विद्युत प्रकल्पाच्या लोकार्पणाची शक्यता आहे. नागपुरात संघाचे मुख्यालय आहे आणि पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे याला महत्त्व आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी नागपूरला आले नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा या चर्चेला पूर्णविराम देणारा ठरू शकतो.भाजपचे वरिष्ठ नेते व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रात भूपृष्ठ वाहतूक हे महत्त्वाचे खाते सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी नागपूरसह विदर्भात विविध विकास कामांच्या घोषणा केल्या आहेत. मोदींच्या हस्ते ज्या विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. त्यामध्ये गडकरींनी केलेल्या घोषणांमधील काही कामांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
पंतप्रधान मोदी २१ ला उपराजधानीत
By admin | Updated: August 7, 2014 01:21 IST