ठाणे : महाड आणि पोलादपूर मार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्यानंतर ठाणे महापालिकेनेदेखील येथील ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल ४ आॅगस्टपासून सर्वच वाहनांसाठी बंद केला होता. परंतु, येथे लावण्यात आलेल्या बॅरिकेटची उंची ही दुचाकीपेक्षा जास्त असल्याने यातून मार्ग काढून दुचाकीस्वार आणि पादचारी या पुलावरून जीवघेणा प्रवास करीत आहेत. मात्र, आता पवई आयआयटीने दिलेल्या अहवालानुसार हा पूल पादचाऱ्यांसह सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी अतिशय कमकुवत झाल्याने तो दोन दिवसांत पूर्णपणे बंद करावा, असे स्पष्ट केले आहे. पालिकेने २०१४ च्या सुमारास या पुलाचा सर्व्हे करण्यासाठी दिल्ली मेड कंपनी आणि आयआयटी- रुडकी यांच्या माध्यमातून पुलाच्या खालच्या बाजूस सेन्सर बसवले होते. त्यातून चारचाकी वाहने जाऊ शकतात का, याचा अभ्यास केला जाणार होता. त्यानुसार, दुपारच्या वेळेस चारचाकी वाहनांना या पुलावरून प्रवेश दिला गेला होता. तसेच दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचाही अभ्यास केला होता. त्यानुसार, अहवाल तयार करून या पुलावरून अवजड वाहने जाणे शक्य नसल्यावर शिक्कामोर्तब केले होते. तरी दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना प्रवेश दिला जात होता. महाडमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पालिकेने हा पूल ४ आॅगस्टपासून हलक्या वाहनांसाठीदेखील बंद केला होता. (प्रतिनिधी)>हालचाली सुरूपवई आयआयटीचा अहवाल नुकताच ठाणे पालिकेला मिळाला असून त्यांनी पूल अतिशय कमकुवत झाल्याचे सांगितले आहे. येथून दुचाकी, पादचाऱ्यांसाठीदेखील तो धोकादायक असल्याचे त्यात नमूद केले आहे. पूल दोन दिवसांत पूर्णपणे बंद करा, असेही सांगितले आहे. पालिकेच्या संबंधित विभागाशी चर्चा केली असता, तसा अहवाल आल्याचे मान्य केले आहे. त्यानुसार, पूल बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कळवा पूल पूर्ण बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 05:33 IST