मुंबई : नाशिक बाजार समितीमधील वेतन घोटाळ््यातील आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.५८ लाख रुपयांच्या घोटाळ््याप्रकरणी आरोपी असलेल्या देवीदास पिंगळेंना २९ डिसेंबर रोजी नाशिक सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर पिंगळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार देत चांगलाच दणका दिला. ‘आरोपीवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासही सुरू असल्याने अर्जदाराची जामिनावर सुटका केली जाऊ शकत नाही,’ असे म्हणत न्या. मृदूला भाटकर यांनी पिंगळे यांचा जामीन नाकारला. २५ आॅक्टोबरला एसीबीने ५७ लाख ७३ हजार ८०० रुपये एका कारमधून जप्त केले. २२ डिसेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. एपीएमसीच्या कर्मचाऱ्यांकडून पिंगळे लाच घेत असल्याचा आरोप एसीबीने केला आहे. ही रक्कम बेहिशेबी असल्याचेही एसीबीने म्हटले आहे. मात्र ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची असल्याचा दावा पिंगळे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
पिंगळे यांच्या जामिनास हायकोर्टाचा नकार
By admin | Updated: February 14, 2017 04:09 IST