राजरत्न सिरसाट
अकोला, दि.२१ : कृषीच्या विविध विषयांमध्ये पीएच.डी. करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता येत्या शैक्षणिक सत्रापासून सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार आहे. यासाठीचा निर्णय महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेने घेतला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात एमएससी कृषी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात आली आहे. राज्यात दरवर्षी १० ते १५ टक्के कृषी (बीएससी) अभ्यासक्रमासह पदव्युत्तर कृषी (एमएससी) तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्या वाढत आहे.
राज्यात १९० कृषी महाविद्यालये असून, कृषी विषयातील विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची स्पर्धा वाढली आहे. मागील शैक्षणिक सत्रात जवळपास ५५ हजार विद्यार्थ्यांनी कृषी पदवीसाठी अर्ज केले होते. यापैकी १४ हजार ५०० विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला, म्हणजेच ३५ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. यावर्षी ६९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. जागा मात्र १४,७४७ आहेत.
दरम्यान, बीएससी कृषी पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर एमएससी कृषीला प्रवेश घ्यायचा असेल, तर प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. पीएच.डी. पदवीसाठी एमएससी करावी लागत असल्याने एमएससीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. यावर्षी राज्यात १५,३२७ विद्यार्थ्यांनी एमएससी प्रवेशासाठी सीईटी दिली आहे. एमएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पीएच.डी. करण्याकडे कल वाढला आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठात पीएच.डी.च्या जवळपास २०० जागा आहेत. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने येत्या शैक्षणिक सत्रापासून पीएच.डी. प्रवेशाकरिता सीईटी घेतली जाणार आहे.
असे आहेत पीएच.डी.चे विषय - कृषी विद्याशास्त्र- जैवतंत्रज्ञान-फलोत्पादन शास्त्र- अन्न तंत्र- मृद व रसायनशास्त्र-विस्तार शिक्षण- कृषी अर्थशास्त्र- वनस्पती शास्त्र-कीटकशास्त्र- वनस्पती क्रिया शास्त्र-वनस्पती रोग शास्त्र- पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र-भाजीपाला शास्त्र-फ्लॉरीकल्चर -कापणी पश्चात तंत्रज्ञान- कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी- कृषी शक्ती व अवजारे- सिंचन व निचरा अभियांत्रिकी- मृद व जलसंधारण अभियांत्रिकीअपारंपरिक ऊर्जा स्रोत - बीएससी, एमएससीनंतर पीएच.डी.साठी विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. पीएच.डी. प्रवेश पारदर्शक होण्यासाठी कृषी अभ्यासक्र माच्या येत्या शैक्षणिक सत्रापासून सीईटी घेतली जाणार आहे.- डॉ. श्रीकांत काकडे,संचालक (शिक्षण),महाराष्ट् कृषी, शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.