नागपूर : विदर्भात कोट्यवधी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व सुनील शुक्रे यांनी शुक्रवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रतिवादींमध्ये राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागाचे सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, शिक्षण शुल्क समितीचे सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आदींचा समावेश आहे. यासंदर्भात आर.व्ही. रागीट यांनी याचिका दाखल केली आहे. विदर्भातील अनेक शैक्षणिक संस्थांतर्फे वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम चालविले जातात. संस्था संचालक शासनाची शिष्यवृत्ती हडपण्यासाठी बोगस विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवतात. तसेच, विद्यार्थी अपात्र असतानाही शिष्यवृत्तीसाठी दावे सादर करतात. संस्था संचालक व शासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे बेकायदेशीररीत्या शिष्यवृत्ती मिळविली जात आहे. परिणामी, शासनाचे कोट्यवधी रुपये संस्था संचालक व अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी याचिका
By admin | Updated: May 9, 2015 01:12 IST