नाशिक : कर्जाची परतफेड करता येत नसेल, तर तुझ्या पत्नीला आमच्याकडे धाड, अशी धमकी परभणीतील गोंधळी समाजाच्या जातपंचायतीने वाळीत टाकलेल्या एका कुटुंबाला दिल्याचा धक्कादायक प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघड केला आहे. प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर पंचांनी त्यांचे मोबाईल बंद केल्याने त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. पंचांच्या धमकीनंतर पीडित कुटुंब दहशतीत असून त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू येथील दीपक व सोनी भोरे यांनी पंचांकडून ९० हजार रुपये कर्ज घेतले होते. तिप्पट व्याज भरल्यानंतरही पंचांकडून मुद्दल म्हणून त्यांच्याकडे सहा ते सात लाख रुपयांची मागणी केली जात आहे. कर्ज न फेडल्यास तुझ्या पत्नीला गावी आमच्याकडे धाड, अशी धमकी गोंधळी समाजाच्या पंचांनी दीपक भोरे यांना दिली आहे. पंचांच्या भितीने भोरे दाम्पत्याने परभणीतून पळ काढत नाशिकला आश्रय घेतला आहे. त्यांना आधार देणाऱ्या सुभाष उगले यांनाही पंचांकडून धमक्या दिल्या जात आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. भोरे कुटुंबांवरील बहिष्कार मागे घ्यावा. जातपंचायत बरखास्त करावी, अशी मागणी दीपक भोरे यांनी केली आहे. सुसंवादाने मार्ग न निघाल्यास पोलिसांत तक्रार करण्याचेही त्यांनी ठरविले आहे. (प्रतिनिधी)
कर्ज फेडा, अन्यथा पत्नीला धाडा!
By admin | Updated: January 20, 2016 02:39 IST