औरंगाबाद : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ५ जूनचा ‘अल्टिमेटम’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला. या तारखेपर्यंत संपूर्ण कर्जमाफी, जनावरांना चारा-पाण्याची सोय आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ न केल्यास शेतकरी रुमणे हातात घेऊन सरकारला बडवतील, असा इशाराही त्यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या मराठवाडा दुष्काळ परिषदेत खा. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवीला. जे सरकार शेतकऱ्यांना जगू देत नाही, जनावरांना चारा पाणी देत नाही, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करत नाही, त्या सरकारला जगू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांनो ‘जेलभरो’ साठी तयार आहात का.. असे विचारताच संपूर्ण मैदानातून शेतकऱ्यांनी ‘होय....’ असा प्रतिसाद दिला. आता सरकारने कर्ज पुनर्गठनाचा निर्णय घेतला आहे. मात्र ते करताना शेतकऱ्यांना पाच वर्षांत ५४ टक्के व्याज हे सरकार आकारणार असल्याचा आरोप करून ते म्हणाले, १९७२च्या दुष्काळात वसंतराव नाईक यांनी जनतेला अन्नधान्य आणि रोजगार देण्यात कमी पडलो तर जाहीर फाशी द्या असे जाहीर केले होते. इतक्या गांभीर्याने दुष्काळाचा विषय हाताळला होता. त्यावेळी राज्यात ४५ लाख लोकांना रोजगार दिला. जगभरातून धान्य मागवून लोक जगवले. आता सरकार दिसतच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री आ. जयंत पाटील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, दिलीप वळसे पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, फौजिया खान, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ. सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आदींची मंचावर उपस्थिती होती.>आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतया परिषदेत राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून औरंगाबाद जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या १४६ शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना तसेच कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा चेक देण्यात आला. खा. पवार यांच्या हस्ते ९ महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात चेक देण्यात आले. इतरांना सभेच्या ठिकाणीच चेक देण्यात आले. परिषदेत पैठण येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या सृष्टी जावळे नावाच्या मुलीने आपली व्यथा मांडली. आम्ही जिद्दीने शिकूच पण सरकारने कर्जमाफी करून आमच्या कुटुंबाच्या डोक्यावरील भार हलका करावा, असे आवाहन केले.
कर्जमाफीसाठी पवारांचा ‘अल्टिमेटम’
By admin | Updated: May 17, 2016 05:57 IST