मुंबई : सिंचन घोटाळ्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात चौकशीचा फास आवळायला सुरुवात केली असून, दोघांनाही समन्स बजावून या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मराठवाड्यातील दुष्काळ, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि मुंबइचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या बदलीवरून सरकारला धारेवर धरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने जेल भरो आंदोलनाची हाक दिलेली असताना अजित पवार व तटकरे यांच्या विरोधात चौकशीचा फास आवळून सरकारने एक पाऊल पुढे टाकले असल्याचे मानले जात आहे. एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले की आम्ही अजित पवार यांना (किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी) १६ सप्टेंबर रोजी, तर सुनील तटकरे यांना (किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी) १५ सप्टेंबर रोजी बोलावले आहे. या दोघांचे वकील त्यांची बाजू मांडू शकतात का असे विचारले असता दीक्षित म्हणाले की त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती असलेली व्यक्तीच ते काम करू शकेल. धरणांच्या बांधकामाचे कंत्राट देताना बेकायदेशीरपणा आणि अनियमितता झाल्याचा निष्कर्ष एसीबीने काढला असला तरी अजित पवार यांना कोणत्याही स्वरुपाची लाच मिळाल्याचे अजून स्पष्ट झालेले नाही. फार मोठ्या प्रमाणावर रोख रकमेचे व्यवहार झाले आहेत; परंतु ते स्पष्ट करतील अशा बँक व्यवहारांसह कोणताही कागदोपत्री पुरावा नाही, एसीबीकडे नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
पवार, तटकरेंना एसीबीचे समन्स
By admin | Updated: September 14, 2015 03:00 IST