अहमदनगर : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि कॅन्सरचा संबंध नसल्याच्या वक्तव्याने वादग्रस्त ठरलेले भाजपा खासदार दिलीप गांधी यांचा रविवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. संसदेची केंद्रीय समिती आणि नगरच्या ‘जाणकार’ खासदारांची तंबाखुवरील मते व अहवालाची संसदेत चिरफाड करू, असे सांगत पवार यांनी तंबाखूविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.‘तंबाखू सेवनाने कॅन्सर होतो हे अद्याप सिद्ध झालेले नाही, पण अन्नपचन मात्र होते’, असा जावईशोध तंबाखूविक्रीशी संबंधित नियमांच्या समीक्षेसाठी नेमलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष खा. गांधी यांनी लावला होता.खा. गांधी यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवताना पवार म्हणाले, तंबाखुबाबत मी काही वैद्यकीय जाणकार नाही. त्यामुळे याविषयी मी काय बोलणार. वैद्यकीय ‘जाणकार’ नगरमध्येच आहेत. गेल्या आठवड्यात गांधी यांच्यासह रामप्रसाद सरमाह व अलाहाबादचे बडे बिडी व्यावसायिक असलेल्या श्यामचरण गुप्ता या भाजपा खासदारांनी तंबाखूवरून उधळलेली मुक्ताफळे देशभर चर्चेचा विषय बनली आहेत. (प्रतिनिधी)
तंबाखूविरोधात पवार झाले आक्रमक
By admin | Updated: April 6, 2015 06:29 IST