ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 14 - ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा पुरवणी तपास अहवाल ‘एसआयटी’ दि. २९ सप्टेंबरला उच्च न्यायालयात सादर करणार आहे. ‘एसआयटी’ने समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली), डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (४८, रा. पनवेल, जि. रायगड) यांना अटक केली आहे. तिसरा संशयित विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, जि. सातारा) हा फरार आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये या तिघा संशयितांच्या विरोधात भक्कम परिस्थितीजन्य पुरावे हाती लागले आहेत. हा अहवाल पाहून संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावर आरोप निश्चितीचे आदेश उच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे.
पानसरे हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी गायकवाड हा सध्या कळंबा कारागृहात आहे. तावडे गेली अकरा दिवस पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या चौकशीमध्ये भक्कम असे परिस्थितीजन्य पुरावे हाती आले आहेत. हे दोघेही संशयित मडगाव-गोवा येथे २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यांतील फरार असलेले आरोपी रूद्रगौंडा पाटील, सारंग अकोळकर, प्रवीण लिमकर व जयप्रकाश हेगडे व विनय पवार यांच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तावडेची काळ्या रंगाची बॉक्सर मोटारसायकल बेपत्ता आहे. ती कोल्हापुरात घेतल्याचे निष्पन्न झाले तसेच गुन्ह्यात वापरलेली ट्रॅक्स पोलिसांनी वाशिम येथून जप्त केली. तावडेने आतापर्यंत पोलिसांना दिलेल्या माहितीची खातरजमा केली असता ती खोटी निघाली आहे. त्यामुळे तो माहिती लपवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल येथील ‘सनातन’ आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधांच्या साठ्याप्रकरणी ‘एसआयटी’ने गोवा आश्रमातील महिला डॉक्टर आशा ठक्कर हिला ताब्यात घेतले आहे. ती वीरेंद्र तावडेच्या सांगण्यावरून आश्रमातील ‘खास’ साधकांना औषधे देत होती. साधिका सुदेशना पिंपळे हिच्याकडून तावडेच्या पत्नीलाही नकळत तीर्थ म्हणून औषधाचा डोस दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत समीर गायकवाडच्या मित्र, नातेवाईकांसह तावडेची पत्नी निधी तावडे, फरारी पवारची पत्नी श्रद्धा पवार, साक्षीदार संजय साडविलकर, शैलेंद्र मोरे यांच्यासह बारा जणांचे इन कॅमेरा जबाब प्रथम वर्ग न्यायाधीशांसमोर घेतले आहेत. पानसरे हत्येदरम्यान समीर गायकवाड व विनय पवार संशयितरित्या फिरताना लहान मुलासह दोघांनी पाहिले आहे. त्यामुळे विनय पवार हा तिसरा संशयित म्हणून रेकॉर्डवर आनला आहे.
पानसरे कुटुंबीयांनी तपासासंबंधी उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल केली आहे. त्यानुसार या तपासावर उच्च न्यायालय देखरेख करत आहे. न्यायालयाने ‘एसआयटी’ने आतापर्यंत केलेल्या संपूर्ण तपासाचा अहवाल सुनावणीला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दि. २९ सप्टेंबरला अहवाल सादर करण्याची तयारी अधिकाºयांनी केली आहे.
या मुद्द्यावर सुरू आहे तपास
संशयित तावडे याने पानसरे यांचे हत्येचा कटक रचण्यास केव्हा व कोठे सुरुवात केली. त्यामध्ये कोणत्या साथीदारांना समाविष्ट करून घेतले. साथीदारांना अग्निशस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण कुठे दिले, अग्निशस्त्रे व काडतुसे कुठून उपलब्ध केली. हत्येनंतर ती कुठे लपविली. गुन्हा करण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर करण्यात आला. प्रत्यक्ष गोळीबार कोणी केला, गुन्ह्याचा कट व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आर्थिक पुरवठा कोणी केला. आदी माहिती पोलिस तावडेकडून घेत आहेत. तावडेच्या कोठडीची उद्या, शुक्रवारी संपत आहे. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती तपास अधिकारी सुहेल शर्मा त्यादिवशी सत्र न्यायालयात सादर करणार आहेत.