पालघर : पालघर जिल्हा मार्च २०१७ पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटेकोर नियोजना बरोबरच शिस्तबध्द पध्दतीने अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले. युनिसेफ तर्फे सोमवारी मनोर येथे स्वच्छता व सुरक्षितता (वर्कशॉप आॅन सॅनिटेशन अॅण्ड हायजिन) या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक शारदा राऊत, जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, युनिसेफचे युसुफ कबीर तसेच पालघरमधील पाणी व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, महिला बालविकास विभाग या विभागांचे अधिकारी तसेच सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी स्वयंसेवी संस्था, उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल असा विश्वास प्रत्येक अधिकाऱ्याला वाटणे गरजेचे असल्याचे बांगर म्हणाले. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण लोकवस्त्यांमधील ८५ टक्के आदिवासी वस्ती असून ग्रामीण भागातील समस्या वैशिष्ट्यपूर्ण व वेगळ्या आहेत. कुपोषण, बालमृत्यूंच्या प्रश्नांसोबत अधिकारी वर्गाने हागणदारी मुक्तीचा विषय गांभीर्याने हाताळला पाहिजे. गटविकास अधिकाऱ्यांनी फिल्ड व्हिजिट व या कामांसाठी विशेष दौऱ्यांचे आयोजन करणे, विशेष ग्रामसभांचे आयोजन करणे, झालेल्या कामांचे आॅडिट करून घेणे, तसेच सगळ्यांचा सहभाग करून घेतल्यास जिल्हा ठरलेल्या वेळेत हागणदारी मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला. याकामी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभेल असेही बांगर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)>लोक सहभागावर भर तीन टप्प्यांचे नियोजनमार्च २०१७ पर्यंत संपूर्ण पालघर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठेवले असून ते साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सामाजिक व सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था उद्योगांतील सीएसआर फंड, बचत गट, माध्यम व लोकसहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. तलासरी तालुका हा हागणदारी मुक्त जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर असून जिल्ह्यातील इतर तालुके हे येत्या मार्च अखेरीस हागणदारी मुक्त करण्यासाठी तीन टप्प्यांचे नियोजन केल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली. ‘स्वच्छ पाडा, स्वच्छ घर, निर्मल आपले पालघर’ हे घोषवाक्य जाहीर करण्यात आले असून ते साध्य करण्यासाठी विविधस्तरांवर प्रयत्न केले जाणार असल्याचे त्या पुढे म्हणाल्या. हागणदारी मुक्त जिल्हा ही लोकचळवळ होण्यासाठी विद्यार्थी, माध्यम व इतर घटकांचा सहभाग करून घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
मार्चपर्यंत पालघर जिल्हा हागणदारीमुक्त
By admin | Updated: July 20, 2016 03:52 IST