सुरेश काटे,तलासरी- सन २०१५-२०१६ ची तलासरी तालुक्याची रखडलेली वार्षिक आमसभेला अखेर मुहूर्त सापडून ती बुधवारी आमदार पास्कल धनारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र, त्यात नेहमी प्रमाणे तालुक्याच्या विकासा संदर्भात कोणतीही ठोस चर्चा न होता ती गोंधळात पार पडली. गटविकास अधिकारी राहुल धूम यांनी आपल्या प्रस्तावनेत दिरंगाईनी होत असलेली आमसभा वैधानिक नसून अनौपचारिक असल्याचे सांगितल्याने ह्या आमसभेचा फायदा काय असा प्रश्न नागरिकांना पडला.पंचायत समितीच्या सभागृहाचे दुरु स्तीचे काम सुरु असल्याने आवारात मंडप उभारून आमसभा घेण्यात आली. या वेळी व्यासपीठावर सभा अध्यक्षासह, गट विकास अधिकारी राहुल धूम, तहसीलदार विशाल दौडकर, समाजकल्याण सभापती धर्मा गोवारी, सभापती वनशा दुमाडा, उपसभापती भानुदास भोये, नगराध्यक्ष स्मिता वळवी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध खात्याचे अधिकारी, नागरिक, सरपंच उपस्थित होते.आमसभेत झाई बोरगाव पाणीपुरवठा योजना, तलासरी पाणी पुरवठा योजना, बेपत्ता मच्छीमार, तालुक्यातील अवैध खदानी व रेती, आरोग्याचे प्रश्न, गरोदर मातेचा मृत्यू, अंगणवाडी कपाट घोटाळा, तसेच खाजगी शिक्षण संस्थेची मनमानी इत्यादी विषय प्रामुख्याने विशेष गाजले. तलासरी शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त आहेत. परंतु डोंगारी भागात शाळांत शिक्षकाची कमतरता असताना मात्र रेल्वे मार्गा लगतच्या व मोक्याच्या शाळांमध्ये मंजूर पदा पेक्षा अतिरिक्त शिक्षकांचा भरणा आहे. तसेच वखाल अदानी शाळेत शासनाकडून पुरविलेल्या सायकली देताना विद्यार्थ्यांकडून १५०० रु पये घेण्यात आल्याचे बोरीगावाचे उपसरपंच अर्जुन वांगड यांनी सांगून कारवाईची मागणी केली. वेवजी येथील एम बी बी आई शाळा महाराष्ट्रात असताना तलासरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारून गुजरात राज्यातील मुलांना प्राधान्याने प्रवेश दिला जातो व या शाळेत सी.बी.एस.इ.ला मान्यता नसताना ती सुरु करण्यात आल्याचे सांगून यावर कारवाईची मागणी पप्पू यादव यांनी केली यावर माहिती घेऊन कारवाई करण्याचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी सदानंद जनाथे यांनी सांगितले.तालुक्यात गावठाण जमिनी आहेत परंतु, त्यावर अतिक्र मणे असल्याने शाळा, अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने खुरड्यासारख्या खोल्यात मुलांना कोंबून पोषण आहार द्यावा लागतो. वीज मंडल तर्फे खांब, तारा टाकण्याचे काम सुरु असून मार्च अखेर ते पूर्ण करण्यात येईल तसेच २ कोटींची वीज थकबाकी असल्याचे अधिकारी सचिन भांगरे यांनी सांगितले. तालुक्यात अधिकारी कर्मचारी राहत नसल्याने त्यांचा पगार रोखण्याची कारवाई करण्यात आली परंतु गावाच्या सरपंचांनी कर्मचारी अधिकारी राहत असल्याचे दाखले दिल्याने कारवाईत अडथळा आला.>आमदार, खासदारांविषयी नाराजीपाटबंधारे विभागाकडून पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधले जातात पण या बंधाऱ्यात गाळ वर्षानु वर्षे काढला जात नसल्याने पाणी अडत नाही व लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर गाळ काढण्याचे काम पाटबंधारे विभागाला करता येत नसून रोजगार हमीतून गाळ काढता येतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तलासरी तालुक्यात सर्वच खात्यात रिक्त पदे आहेत त्यामुळे कामात दिरंगाई होते. रिक्त पदाचा प्रस्ताव दरमहा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवला जातो पण कार्यवाही होत नाही असे सांगण्यात आले. हा आदिवासी तालुका त्यातच आमदार पास्कल धनारे व खासदार चिंतामण वनगा हे येथीलच असून सुद्धा रिक्त पदाची समस्या दूर होत नसल्याने नागरिकांनी आमसभेत नाराजी व्यक्त केली. >येथे अधिकाऱ्यांची झाली पंचाईतझाई बोरिगावसाठी शासनाने ४ कोटी ७५ लाखाची योजना मंजूर करून ती पूर्णही झाली आहे. पण यात अनेक त्रुटी असतांना ती ताब्यात घेण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव येत असल्याचे उपसरपंच अर्जुन वांगड यांनी सांगितले. या योजनेत बोरीगावच्या १९ पाड्यांना पाणीपुरवठा करावयाचा असताना फक्त तीन पाड्यांना पाणीपुरवठा होतो. तसेच पाणी टाकी उभारण्यासाठी जमीन दान घेण्यात आली आहे. परंतु ती घेताना योग्य ते कागद पत्र न बनाविल्याने भविष्यात वाद निर्माण होऊन योजना बंद पडू शकते याबाबत हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावर उपअभियंता पाटील उत्तर देऊ शकले नाहीत.तलासरी तालुक्याची मासिक सभा घेण्यात येते पण या सभेला अधिकारी उपस्थित राहत नसल्याने प्रश्न सोडविता येत नसल्याचे पंचायत सदस्य प्रकाश सांबर यांनी सांगितले. तर पदाधिकाऱ्यांना अधिकारी मान देत नसून तुच्छतेची वागणूक देत असल्याचे उपसभापती भानुदास भोये यांनी सांगितले दापचरी तपासणी नाक्यावर अवजड वाहने पास करणाऱ्या टोळ्या असल्याबाबत विचारणा केली असता अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. >गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार! या आमसभेला वन विभाग उधवा- बोर्डी, पोलीस खाते, भूजल विकास यंत्रणा, दुय्यम निबंधक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, लागवड अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, आई टी आई, मत्स्य अधिकारी, बंदर अधिकारी, बीएसएनएल आदी विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्याने संबधित विभागाच्या विषया वर चर्चा करता न आल्याने नागरिकांनी कारवाईची मागणी केली. त्यावर सभेचे अध्यक्ष आमदार पास्कल धनारे यांनी संबधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
तलासरीची आमसभा गोंधळात पूर्ण
By admin | Updated: March 4, 2017 03:29 IST