म्हाकवे : इमारत बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गर्भवती महिलांना राज्य शासनाच्या कल्याणकारी मंडळाने शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सहा महिन्यांची पगारी रजा द्यावी, खेळामध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या कामगारांच्या मुलांना प्रोत्साहन अनुदान तसेच प्रत्येक दिवाळीला ‘दीपावली भेट’ कल्याणकारी मंडळाने द्यावी, अशी मागणी लालबावटा कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. भरमा कांबळे व जिल्हा सचिव शिवाजीराव मगदूम (सिद्धनेर्लीकर) यांनी केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय कामगारांच्या अधिवेशनात केल्याची माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. इतरांना निवारा करून देणारे बहुतांश इमारत बांधकाम कामगार उपेक्षेचे जीवन जगत आहेत. त्यामुळे १९९६ मध्ये केंद्र शासनाने या क्षेत्रातील कामगारांच्या हिताच्यादृष्टीने काही कायदे केले; परंतु सद्य:स्थितीत हे कायदे अपुरे पडत असून, त्यामध्ये दुरुस्त्या करण्यात याव्यात, अशी अपेक्षाही कॉ. कांबळे यांनी व्यक्त केली आहे.प्रत्येक कामगाराला त्याच्या स्वप्नातील छोटेसे घरकुल व्हावे यासाठी ‘घरबांधणी’ अनुदान देण्यात यावे, गर्भवती महिलांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करून त्यांना या काळात सहा महिन्यांची पगारी रजा मिळावी, आदी मागण्यांसाठी आम्ही आग्रही असून, त्याच्या पूर्ततेसाठी शासनाशी लढा देऊ, असाही निश्चय केल्याचे कॉ. मगदूम यांनी सांगितले.राज्यातील नोंदीत कामगारांच्या तुलनेत जिल्ह्यात एक चतुर्थांश कामगारांची नोंद झाली आहे. कामगार नोंदणीला प्राधान्य देणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.राज्य संघटनेचीच कामगिरी ठरली प्रभावी :केरळमधील राष्ट्रीय अधिवेशनाला देशातील २७ राज्यांचे प्रतिनिधी आले होते. यावेळी प्रत्येक राज्याच्या प्रतिनिधीने आपापल्या राज्यातील संघटना बांधणीसह राज्य शासनाने दिलेल्या सेवासुविधांबाबत माहिती दिली. यामध्ये संघटना बांधणीचा ‘कोल्हापूर पॅटर्न’ यासह राज्य शासनाने बांधकाम कामगारांना दिलेली मूलभूत आरोग्य सुविधा, मुलांना शिष्यवृत्ती, गर्भवती महिला कामगारांना अनुदान, आदी योजनांमुळे महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक असल्याच्या प्रतिक्रिया इतर प्रतिनिधींनी दिल्याचेही भरमा कांबळे यांनी सांगितले.
बाळंतपणासाठी पगारी रजा; खेळाडूंना अनुदान द्या
By admin | Updated: November 16, 2014 23:50 IST