खेर्डी : भातावर संशोधन करण्यात शिरगाव-रत्नागिरी येथील कृषी संशोधन केंद्राने राज्य, राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या संशोधनाची पताका फडकवली आहे. रत्नागिरी हा भाताचा वाण लॅटीन अमेरिका, कॅरिबियन आयर्लंड येथील पॅराग्वे परगण्यात सीईए ३ या नावाने २५ वर्षांपासून आपल्या उत्पादनाची कमाल दाखवत आहे. तर रत्नागिरी १ हे वाण दक्षिण आफ्रिकेतील झांबिया प्रांतात सन १९९०पासून सर्वदूर दिसत आहे. भातावर संशोधन करण्यासाठी देशात कोईम्बतूर नंतर स्थापन झालेल्या शिरगाव कृषी संशोधन केंद्राने भातपिकामधील संशोधन, बीजोत्पादन, तंत्रज्ञान विकास व विस्ताराच्या कार्याचा मोठा टप्पा पार केला आहे. १३ भात जातींचे संशोधन तसेच पश्चिम महाराष्ट्रापेक्षा १०० टक्के जास्त उत्पादन देणाऱ्या भुईमुगाच्या शोधन कार्यातून शेतीतील दूरगामी व आमूलाग्र बदल घडविण्यात क्रांतीकारी संशोधन इथे झाले आहे. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेलं कृषी संशोधन केंद्र शिरगाव हे भातावर संशोधन करणारं एक प्रमुख केंद्र ठरलं आहे. सन १९६० ते आजतागायत इथे चित्तवेधक काम झालं. हरितक्रांतीनंतर संकरीत जातीच्या बि-बियाणांची निर्मिती इथे झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर तर कोकणात ४५०० हेक्टर क्षेत्रावर भातशेती होत असल्याची कागदोपत्री आकडेवारी आहे. गेल्या दशकभरात भातपिकाखालील क्षेत्र घटत चालले असले तरी उत्पादकतेवर त्याचा परिणाम झालेला नाही. सन १९७१मध्ये झिनिया ६३ व ताईचुंग नेटीव १ या बारीक दाण्याच्या जाती संकरातून रत्नागिरी २४ ही अतिबारीक व उत्तम दाण्याचा प्रकार असलेली जात विकसित करण्यात आली. त्यानंतर विविध कालावधीत वेगवेगळे दाणे आणि विभागानुसार भाताच्या ९ सुधारित जाती इथे विकसित झाल्या. भातामध्ये १७ नर व मादी वाण शोधून काढून ११ लाईन्सची नोंदणी नवी दिल्ली येथे करण्यात आली. भाताच्या ३ अतिशय उत्कृष्ट जातींचा म्हणजे रत्नागिरी १, २४ व ७११ कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. लवकर परिपक्व होणे, अधिक उत्पादन स्थिरता, किडी व रोगांना चांगला प्रतिकार करणे, उत्कृष्ट तांदूळ व दाण्याचा उतारा तसेच शिजण्यास उत्तम अशा गुणवैशिष्ठ्यांमुळे हे वाण लोकप्रिय आहे. (वार्ताहर)कृषी संशोधन केंद्र, शिरगाव येथे भातावर संशोधन.कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रसार.उत्कृष्ट तांदूळ व दाण्याचा उतारा तसेच शिजण्यास उत्तम.लॅटीन अमेरिकेतही भाताचे वाण.
भात संशोधनाची पताका सातासमुद्रापार
By admin | Updated: September 18, 2015 23:14 IST