साहेबराव हिवराळे , औरंगाबादयेथील सातारा बीड बायपासवर रविवारी भरदुपारी हॉटेल ‘एमएच-२०’मध्ये पोलिसांनी बेधुंद पार्टी उधळून लावली. संगीत कला प्रदर्शनाच्या नावाखाली नशेत तर्र असलेल्या १०० तरुण-तरुणींचा पाश्चात्त्य संगीतावर नाच सुरू असतानाच पोलिसांनी धाड टाकली. चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दुपारी १२ वाजता सुरू झालेली पार्टी ३ वाजता रंगात आली. नशेत तर्र असलेल्या तरुणांनी गाण्यांचा आवाजही वाढविला. हॉटेलच्या बाजूलाच रुग्णालय आणि वसाहत असल्याने नागरिकांना या धांगडधिंग्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे काही नागरिकांनी सातारा पोलिसांना फोन करून पार्टीची माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एम.बी. टाक, के.डी. महांडुळे, पोलीस कॉन्स्टेबल कल्याण चाबूकस्वार यांच्यासह पोलिसांचे पथक हॉटेलवर धडकले. आमच्याकडे रीतसर परवानगी आहे, आम्ही नियमाचा भंग करीत नाही, असे सांगत संयोजक सनी चहल याने पोलिसांना अडविले. संगीत कला प्रदर्शनासाठी दुपारी १२ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत परवानगी असल्याचे पाहताच पोलिसांनी पाश्चात्त्य संगीत आणि दारू पिऊन थिरकण्याची परवानगी आहे का, असा सवाल केला. काही वेळ दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. संगीत बंद केल्यानंतर तणाव निवळला. पोलिसांनी सनी चहल याच्यासह इतर चौघांविरुद्ध कलम ११०/११७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली. हे हॉटेल लघाने पाटील यांचे असून, त्यांनी मुंबई येथील किशोर कोटियान यांना चालविण्यासाठी दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली. फेसबुकवर पेज‘आफ्टरनून म्युझिकल हँगआऊट’ या नावाने फेसबुकवर पेज करून या पार्टीची जाहिरात करण्यात आली. त्यासाठी तीन मोबाईल नंबर देण्यात आले. या तिन्ही नंबरवर लोकमतच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता यातील सुरुवातीचे दोन नंबर नॉट रिचेबल आले. शेवटच्या नंबरवरून कॉल घेण्यात आला. मात्र, त्याने नाव सांगितले नाही. आमची चूक झाली. पोलिसांनी सांगताच आम्ही पार्टी बंद केली. यामुळे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी बोलाविल्यानंतर आम्ही ठाण्यातही जाऊन आलो, अशी माहिती या नंबरवरून देण्यात आली. पुन्हा हा नंबरदेखील स्वीच आॅफ झाला.
औरंगाबादमध्ये बेधुंद पार्टी उधळली
By admin | Updated: November 24, 2014 03:43 IST