ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करायची किंवा कसे याचा निर्णय स्थानिक पातळीवर सोडल्याचे जाहीर करीत असतानाच ‘आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्या शिवाय भाजपा लढायला सिद्ध आहे,’ असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी शिवसेनेला दिला. त्याचवेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी लोकलमध्ये आपण मित्राला चौथी सिटी देण्याकरिता अंग चोरून बसतो. मात्र पुढे तोच मित्र ते विसरून ऐसपैस कसा बसतो, असे सांगत शिवसेनेला टोला लगावला.भारतीय जनता पार्टीच्या खोपट येथील नुतनीकरण झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहस्त्रबुद्धे हेही उपस्थित होते. पक्षाचे कार्यकर्ते अरविंद पेंडसे यांच्या पत्नी व मुलीने तयार केलेली महापालिकेची प्रतिकृती दानवे यांना प्रदान करण्यात आली. त्यामध्ये महापालिका इमारतीवर भाजपाचा ध्वज फडकल्याचे सूचकपणे दाखवण्यात आले होते.दिल्ली व बिहारमधील पराभवावरून शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केले होते. त्याचा संदर्भ देत दानवे म्हणाले की, दिल्ली व बिहार सोडले तर अन्यत्र भाजपाने मोठे यश संपादन केले आहे. पालघरमधील जिल्हा परिषद निवडणुकीत आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला उत्तम यश लाभले. पक्षाने नऊ जागांवरून ४२ जागांवर मजल मारली. फार पूर्वीपासून ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे ठाणे हे भाजपाचेच आहे. जिल्ह्यातील आपली ताकद अधिकाधिक वाढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष कार्यालये सुरु करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार १५ ठिकाणी कार्यालये घेतली आहेत. त्यापैकी पहिले कार्यालय सुरु करण्याचा मान ठाण्याने मिळवला असून नाशिकमध्ये कार्यालयाच्या ठिकाणी भूमिपूजन झाले आहे, असे दानवे म्हणाले.पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सहस्त्रबुद्धे म्हणाले की, यंदाचे वर्ष हे कार्यकर्त्यांनी मेहनत करण्याचे असून पुढील वर्ष हे विजय साजरे करण्याचे आहे. आपल्या कामाने ठाणेकरांच्या ह्रदयात हक्काचे स्थान निर्माण करा, असे सांगताना प्रत्येक वॉर्डाकरिता स्वतंत्र वचननामा देण्याची सूचना त्यांनी केली. पक्षाचे नवे कार्यालय नव्या राजकारणाची नांदी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ठाणे भाजपाचे अध्यक्ष संदीप लेले यांनी प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यासमोर मनपा निवडणूक जिंकणे हेच एकमेव लक्ष्य असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)डावखरेंविरोधात लढणार : ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेने ऐनवेळी आपला उमेदवार मागे घेऊन वसंत डावखरे यांना बिनविरोध निवडून देवून सहकार्य केले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेची काय भूमिका असेल, याबाबत छेडले असता, ही निवडणूक शिवसेनेच्या उमेदवाराने लढवावी, यासाठी मी पक्षप्रमुखांशी चर्चा करीन, असे मनोहर जोशी यांनी सागितले. >सामंजस्याशिवाय युती टिकू शकत नाही : मनोहर जोशी बदलापूर : शिवसेना आणि भाजपाची युती सामंजस्याशिवाय टिकू शकत नाही. वाद असावेत, पण ते तुटेपर्यंत ताणू नयेत, असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी लगावला. बदलापूर शिक्षण समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ कार्यक्र मानिमित्ताने आल्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. सध्याच्या नेत्यांत सामंजस्याचा अभाव आहे. त्यामुळे सध्या सरकारमध्ये विविध कारणांवरून मतभेद पाहायला मिळतात. आमच्या काळात आम्ही एकमेकांना सांभाळून घेत होतो. त्यामुळे युती चांगल्याप्रकारे टिकली होती. वाद आमच्या काळातही होत असत, पण आम्ही ते चर्चेने सोडवले होते. सामंजस्य असल्यानेच युती तब्बल २५ वर्षे टिकली होती. आताही तसे झाल्यास वाद संपुष्टात येऊन चांगली कामे होतील, अशा शब्दांत त्यांनी युतीतील नेत्यांचे कान टोचले.
...अन्यथा शिवसेनेशिवाय!
By admin | Updated: April 30, 2016 02:57 IST