सिध्दार्थ आराख/ बुलडाणा : सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी बोलविलेल्या बैठकीचे साधे निमंत्रणही घटक पक्षांना न दिल्याबद्दल खा. रामदास आठवले यांनी बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांची गुरूवारी भेट घेऊन यासंदर्भात विचारणा केली जाणार आहे. समन्वय समितीमध्येही आम्हाला स्थान नसेल, तर घटक पक्षांना सोबत घेऊन दुसरी समन्वय समिती गठीत करू, असा इशाराही त्यांनी दिला. बुलडाणा येथील कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या आठव्या द्विवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी रिपाइं (आ) अध्यक्ष आठवले आले असता, ते ह्यलोकमतह्णशी बोलत होते. सरकारमध्ये दररोज ताण-तणाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकामध्ये समन्वय रहावा, यासाठी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी समन्वय समिती गठीत करण्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भात बुधवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलविण्यात आली होती; मात्र या बैठकीचे साधे निमंत्रणही घटक पक्षांना देण्यात आले नाही. याबाबत विचारले असता आठवले यांनी त्यास दुजोरा दिला. समन्वय समितीमध्ये जर मंत्र्यांनाच घ्यायचे असेल, तर सरकारने आम्हा घटक पक्षांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी सरकार दिरंगाई करीत असेल तर या प्रश्नावर राज्यभर तीव्र आंदोलन सुरू करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
..तर स्वतंत्र समन्वय समिती
By admin | Updated: February 19, 2015 02:18 IST